झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांनंतर आता आणखी एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले जय आणि आदिती यांची प्रेमकहाणी येत्या २६ मार्चला सुफळ संपूर्ण (?) होणार आहे. या जागी आता ‘काहे पिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २८ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही नवी मालिका प्रक्षेपित होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठी मालिकेत मराठी आणि हिंदी संस्कृतीचा मिलाफ दिसून येणार आहे.
‘का रे दुरावा’ या मालिकेने जवळपास गेली सव्वा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. ऑफिसमध्ये असणाऱ्या विचित्र नियमामुळे एका विवाहित जोडप्याची होणारी कुचंबणा, तारांबळ आणि या सगळ्यातून निर्माण झालेल्या रंजक परिस्थितीचे ‘का रे दुरावा’ मध्ये प्रभावीपणे करण्यात आले होते. या अनोख्या संकल्पनेमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेतील जय-अदिती साकारणारे सुयश टिळक आणि सुरुची आडारकर यांच्याशिवाय अविनाश सर (सुबोध भावे), आऊ (इला भाटे) , देव टूर्समधली मंडळी, केतकर काका (अरूण नलावडे), काकू या व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. दरम्यान, आता या मालिकेचा शेवट नक्की कसा होणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. जय आणि आदितीच्या लग्नाबद्दल ऑफिसमध्ये कळाल्यानंतर नक्की काय होणार, हा गहन प्रश्न आगामी दिवसांत प्रेक्षकांच्या मनाला घोर लावून राहणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ka re durava marathi serial on zee marathi say goodbye to viewers soon