काहीही तारतम्य नसणारे ट्विट केल्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या कमाल आर. खानने पुन्हा एकदा ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. केआरकेचे ट्विट कधी थांबण्याचं नावच घेत नाहीत हे अगदी खरं आहे. नेहमी सेलिब्रिटींवर टीका करणाऱ्या, विनाकारण त्यांची खिल्ली उडवणाऱ्या केआरकेने यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत मजल मारली आहे. मोदीजींच्या काही जुन्या ट्विट्सचा उल्लेख करत केआरकेने त्यांच्यावर उपरोधिक टीका केली.

२०१३ मध्ये ज्यावेळी देशात काँग्रेस सरकार होतं त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या सरकारवर टीका करत मोदी यांनी काही ट्विट्स केले होते. सैन्यदलावर पाकिस्तानकडून होणारे भ्याड हल्ले आणि सरबजित सिंगच्या मृत्यूचा संदर्भ देत मोदीजींनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्यांच्या याच ट्विटवर उपरोधिक टीका करत केआरके म्हणाला, ‘मनमोहन सिंग कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नव्हते. पण, मोदीजी तुम्ही मात्र पाकिस्तानला अगदी सडेतोड उत्तर देत आहात.’ एवढंच बोलून तो थांबला नाही तर मोदीजींच्या आणखी एका जुन्या ट्विटवर कमालने बोचरी टीका केली.

https://twitter.com/kamaalrkhan/status/859023164340224000

https://twitter.com/kamaalrkhan/status/859022480190578689

https://twitter.com/kamaalrkhan/status/859022071795286016

‘देशासमोर फार मोठी अडचण आहे. एकीकडे चीनकडून भारताच्या हद्दीत घुसखोरी होते आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडूनही घुसखोरी करून सैनिकांवर हल्ला केला जात आहे. आपलं सरकार मात्र या सर्व प्रकरणांवर काहीच प्रतिक्रिया देत नाहीये, कोणतीच कारवाई करत नाहीये.’ मोदीजींच्या या ट्विटवर टीका करत केआरके लिहितो, ‘मोदीजी… तुम्ही तसे मुळीच नाही आहात. कारण, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लगेचच कारवाई करता. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.’
मोदींचे हे ट्विट बऱ्याच वर्षांपूर्वीचे असून ते पुन्हा एकदा सर्वांसमोर आणत सध्याचं केंद्रातील भाजप सरकार आणि आधीचे काँग्रेस सरकार यामध्ये फारसा काही फरक नसल्याचे केआरकेने त्याच्या या उपरोधिक ट्विटमधून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय.