कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास  ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. मी याआधी कमला मिल्समध्ये गेले आहे, कमला मिल्स म्हणजे एक भुलभुल्लैयाच आहे. अरुंद रस्ते असल्यामुळे तिथे निष्काळजीपणा होणारच असे मत खासदार जया बच्चन यांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जया बच्चन यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनीही या दुर्घटनेवर आपली मतं मांडली. या दुःखद घटनेबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला. ‘मुंबई येथील कमला मिल आग दुर्घटनेत भीषण आग लागून लोकांना त्यांचे प्राण गमावावे लागले ही दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या दुःखात मी सहभागी आहे’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

तसेच या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन महापालिकेवर टीकास्त्र सोडले. कमला मिल कम्पाऊंड या छोट्याशा परिसरात ९६ रेस्तराँ आहेत. त्यांना महापालिकेकडून परवानगी मिळालीच कशी, या रेस्तराँमध्ये फायर ऑडिटही झाले नव्हते. पब आणि रेस्तराँ मालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा मृत्यू झाला, असे त्यांनी म्हटले.

सोशल मीडियावरही या घटनेवरुन संताप व्यक्त होत आहे. रुफटॉप बार ही संकल्पना राबवली जात असताना या बारमधील सुरक्षेची जबाबदारी कोणाची, महापालिकेने या बारमधील फायर ऑडिट केले होते का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamala mills building fire accident there has been negligence says mp jaya bachchan