अभिनेत्री कंगना रणौत तिच्या चित्रपटातील विविध धाटणीच्या भूमिकांमुळे चर्चेत असते. पण, बॉलिवूडची ही ‘क्वीन’ तिच्या चित्रपटांव्यतिरिक्तही सध्या काही वेगळ्याच कारणांमुळेही चर्चेत आहे. कंगनाने नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने करणच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. ही बाब जितकी खरी असली तरीही कंगना आणि तिच्या सहकलाकारांमध्ये चित्रपटाच्या सेटवर मात्र तिचे खटके उडत असल्याच्या चर्चांनीही गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. कंगनाच्या सहकलाकारांसोबतच्या खटक्यांमध्येच आता निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या नावाचाही समावेश झाला आहे.

डीएनएने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आणि काही सूत्रांच्या माहितीनुसार कंगनाचे करणबाबतचे विचार काही प्रमाणात खटकणारेच आहेत. कंगनाच्या म्हणण्यानुसार जेव्हा कधी ती आत्मचरित्र लिहेल त्यावेळी त्या आत्मचरित्रामध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याला अनुसरुन काही भाग त्या पुस्तकात असेल. आणि तो भाग करण जोहरनेच लिहिलेला असेल. कंगनाच्या या वक्तव्याने खुद्द करण जोहरही अवाक् झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिली आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोच्या निमित्ताने एका वेगळ्याच कंगनाची प्रेक्षकांशी भेट होणार आहे. दरम्यान, ‘रंगून’ चित्रपटातील सहअभिनेता सैफ अली खान याच्यासोबत कंगना, करणच्या शो मध्ये आली होती. पण, या कार्यक्रमाच्या चित्रिकरणादरम्यान कंगनाच्या वागण्याबोलण्यातून तिच्या सहकलाकारांसोबतच्या उडणाऱ्या खटक्यांची झलकही या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बी टाऊनची क्वीन कंगना आगामी ‘रंगून’ या चित्रपटातून ‘मिस ज्युलिया’च्या भूमिकेत झळकणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे दर्शन होत आहे. प्रेमाचा त्रिकोण दाखविणाऱ्या या चित्रपटात लव्ह (प्रेम), वॉर (युद्ध) आणि डिसिट (धोका) या त्रिकोणाभोवती फिरणारे कथानक पाहायला मिळू शकते. धैर्य, गॅम्बल आणि रोमान्सची सांगड घालणारा हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.