कालौघात सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील युवा पिढीच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थांनी ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांत गावातील मुलांचे लग्न जमणे ही एक समस्याच बनली आहे. याच गोष्टीचा वेध घेत ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आला आहे. आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. या धमाल गोष्टीला मालवणी भाषेचा तडकाही आहे. अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत आदी कलाकार चित्रपटात झळकत आहेत. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, तसेच चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत संगीतकार आहेत.