हॉलिवूडमधील अनेक शो हे भारतामध्ये देखील चांगलेच लोकप्रिय ठरले आहेत. याच शोपैकी एक म्हणजे ‘फ्रेण्डस्’. १९९४ सालात आलेल्या ‘फ्रेण्डस्’ या शोला भारतात देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. १७ वर्षांनी ‘फ्रेण्डस्: द रियुनियन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २७ मे ला एचबीओ वाहिनीवर हा खास एपिसोड प्रसारित होणार आहे. या शोच्या ट्रेलरनंतर चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या शोची कायमच खास करून तरुणांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळाली. या शोच्या प्रत्येक कलाकाराला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. या शोमधील प्रत्येक कलाकाराबद्दल जाणुन घ्यायला चाहते कायम उत्सुक असतात. पण तुम्हाला माहित आहे का या शोमधील अभिनेत्री लिसा कुड्रोही फॅबीच्या गरोदरपणाच्या एपिसोडवेळी प्रत्यक्षात गरोदर होती?

या शोमध्ये फिबी बुफेची भूमिका साकारणारी अभिनेत्री लिसा कुड्रो गरोदर राहिल्याने निर्मात्यांनी त्याप्रमाणे कथानक वळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या शोच्या चौथ्या सिझनमध्ये फॅबी गर्भवती असल्याचं कथानक टाकण्यात आलं. यात फॅबी तिच्या भावासाठी आणि बहिणीसाठी ‘सरोगेट मदर’ होण्याचा निर्णय घेते. चौथ्या सिझनमध्ये सरोगेट आईची भूमिका साकारत असतानाच लिसाने खऱ्या आयुष्यात मुलाला जन्म दिला होता. तर ‘फ्रेण्डस्’ शोच्या पाचव्या सिझनमध्ये फॅबीची प्रसूती झाल्याचं दाखवण्यात आलं होतं.

गरोदरपणातील शूटिंग आठवणी सांगताना लिसा एका मुलाखतीत म्हणाली होती, ” आम्ही पडद्यामागे आम्ही सहा जण जेव्हा एकत्र असायचो तेव्हा नेहमी सर्व ठीक आहे..चांगला कार्यक्रम करा..लव्ह यू..लव्ह यू…असं कायम एकमेकांना म्हणायचो. मात्र जेव्हा मी गरोदर होते. तेव्हा बाकी सर्व म्हणायचे, चांगला शो करा. लव्ह यू.लव्हू लिटील ज्युलियन. कारण सर्वांना माहित होतं की मुलगाच होणार आणि हे त्याचं नाव होत.” अशी आठवण लिसाने सांगितली होती.

लिसा कुड्रोच्या मुलाने नुकतच युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया या विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. पदवी प्रदान कार्यक्रमातील मुलासोबतचा फोटो शेअर करत लिसाने आनंद व्यक्त केलाय.

एचबीओवरील ‘फ्रेण्डस्: द रियुनियन’ मध्ये लिसा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेनिफर ॲनिस्टन,कॉर्टेनी कॉक्स, मॅथ्यू पेरी हे इतर कलाकारही चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येत आहेत.

खास करून तरुणांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळाली. २००४ सालात या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला. तरी त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुढीच्या पिढीतील तरुणांना देखील या शोने वेड लावलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lisa kudrow was pregnant in real life while filming phoebes pregnancy story in friends show kpw