पुलंच्या स्मृतींची पंचविशी आणि सुनीताबाईंची जन्मशताब्दी यानिमित्ताने महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. हेच औचित्य साधून पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक रंगमंचित केलं गेलं आहे. १९५२ साली ते रंगमंचावर आलं होतं आणि सुनीताबाईंनी त्यात भूमिका केली होती. त्यानंतरही अनेकदा त्याचं मंचन झालं आहे. आणि आता पुनश्च पाऊणशे वर्षांनी ते ‘सवाई गंधर्व’ या नाट्यसंस्थेनं नव्याने रंगभूमीवर आणलेलं आहे.

या नाटकाचं कथानक फार जुनं… संस्थानिकांच्या काळातलं. पुढे संस्थानं विलीन केली गेली आणि नुकतीच लोकशाहीची पहाट उगवू लागली होती, त्या काळातलं. संस्थानिकांची संस्थानं बरखास्त झाली तरी सुंभ जळला तरी पीळ जात नाही म्हणतात तसं संस्थानिकांची सत्ता गाजवायची हौस काही फिटली नव्हती. प्रजेवर नाही, तरी घरातल्यांवर तरी सत्ता आणि गुर्मीचे आसूड ओढणं त्यांनी सोडलं नव्हतं. नंदनवाडी संस्थानचे राजे ह्यहिज हायनेसह्ण याच मदांध गुर्मीत वावरत होते. त्यांच्या चार मुलांना वाड्याच्या चार भिंतींच्या आड कोंडून ते आपलं गेलेलं राजेपण उपभोगत होते. त्यांची थोरली कन्या दीदीराजे पायांच्या पांगळेपणानं घराबाहेर पडू न शकणारी. पण मनातील कल्पनेच्या उंच भराऱ्यांनी मात्र कवितेच्या माध्यमातून स्वातंत्र्य उपभोगणारी. तथापि व्हीलचेअरला खिळलेल्या आयुष्यानं पार कंटाळलेली… महाराजांची लाडकी लेक. तिच्या औषधपाण्यात जराही हयगय झालेली त्यांना चालत नसे. त्यासाठी डॉक्टर पटवर्धनांची नेमणूक केलेली. ते या मुलांच्या जन्मापासूनचे राजवैद्या. राणीसाहेबांच्या पश्चात मातृतुल्य वात्सल्याने मुलांचं संगोपन करणारे. त्यांचं दुखलंखुपलं पाहणारे. दुसर्या बेबीराजे. आपल्या मनासारखं आयुष्य जगता यावं म्हणून बंड करणाऱ्या. प्रताप आणि राजेंद्र या भावांसह वाड्यातल्या बंदिस्त आयुष्याला त्या मनस्वी कंटाळलेल्या. त्या मात्र महाराजांना जराही घाबरत नाहीत. मनाला येईल तसं वागतात. मात्र दोन्ही भाऊ अंगात वकूब नसल्याने वडलांना घाबरणारे. त्यांच्या आज्ञेत असलेले. सगळ्यांनाच वाड्याबाहेरच्या स्वतंत्र जगाची ओढ लागलेली. पण ते नाइलाजानं वाड्यात अडकून पडलेले. दीदीराजेंच्या कविता बेबीराजे तरुण कवी संजय देशमुख यांना त्यांच्याही नकळत पाठवतात. त्यांना त्या फार फार आवडतात. संजयच्या कविताही दीदीराजेंना आवडत असतात.

एक दिवस अकस्मात संजय दीदीराजेंना भेटायला येतात… आणि दीदीराजेंना आपल्यातल्या प्रतिभावान कवयित्रीचा नव्याने शोध लागतो. संजय त्यांना मुक्त आकाशात भरारी मारण्याची स्वप्नं दाखवतात. त्यांच्यावर आपलं प्रेम असल्याची कबुली देतात. पण दीदीराजेंना आपल्या अपंगत्वामुळे आपण अशी स्वप्नं पाहू शकत नाही याची लख्ख जाणीव असते. मात्र संजयच्या भेटीने त्यांच्यात नवा उत्साह, नवा उमंग जागतो. त्या हळूहळू बर्या होऊ लागतात. पण महाराजांना आपण दीदीराजेंशिवाय जगूच शकत नाही असं वाटत असतं. वडलांच्या आपल्यावरील प्रेमामुळे आणि अवलंबित्वामुळे दीदीराजे संजयबरोबरच्या नव्या जगाची कल्पना करणं सोडून देतात. पण बेबीराजे मात्र बंडा सावंतच्या रूपात आपल्या मनासारखा जोडीदार निवडतात. तो नुुकताच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला असतो. महाराजांच्या एकेकाळच्या मोतद्दाराचा तो मुलगा असतो. त्यामुळे महाराज पिसाटलेले असतात. मात्र बेबीराजे आपल्या निर्णयावर ठाम असतात.

या सगळ्यांच्या आयुष्याच्या नौका पुढे कुठला काठ गाठतात हे प्रत्यक्ष नाटकातच पाहणं इष्ट.

पुलंनी पाऊणशे वर्षांपूर्वी लिहिलेलं हे नाटक. त्यातले संस्थानिक आता नावापुरतेच उरले आहेत. पण त्यानिमित्ताने मानवी भावभावनांचे जे आंदोळ पुलंनी रेखाटले आहेत ते कालातीत आहेत. आज काहीसं जुनं झालेलं हे नाटक प्रेक्षकांना भावतं ते त्यातील मानवी मूल्यांमुळे. राजेश देशपांडे यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. त्यांनी नाटकातील व्यक्तिरेखा त्यांच्या विविध भावकल्लोळांसह मूर्त केल्या आहेत. प्रसंगरेखाटन, पात्रांच्या लकबी, त्यांची प्रत्येकाची मानसिकता, वागणं-बोलणं यांची चपखल मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. सगळ्याच पात्रांना त्यांचा त्यांचा आपला स्व-भाव त्यांनी दिला आहे. यातले डॉक्टर पटवर्धन तर लोभसवाणेच चितारले गेले आहेत. त्यामुळे नाटकातलं जुनेपण दृष्टीआड होतं आणि प्रेक्षक नाटकाला नव्या उत्सुकतेनं सामोरे जातात.

संदेश बेंद्रे यांनी खालसा झालेल्या संस्थानिकाचा वाडा तपशिलांत उभा केला आहे. त्यातली अनेक दालनं, भलीमोठी तावदाने, तत्कालीन गाद्यागिरद्यांचे सोफे… वगैरे. अथर्व गोखले यांनी प्रकाशयोजनेतून दिवसातले निरनिराळे प्रहर, पात्रांचे मूड्स ठळक केले आहेत. मिलिंद जोशी यांनी ओठांवर रुळणारं शीर्षकगीत आणि प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती करणारं संगीत दिलं आहे. मंगल केंकरे यांनी पात्रांना ज्याचा त्याचा आब आणि पिंडप्रकृतीनुसार वेशभूषा केली आहे. अमोल बावडेकर आणि स्वानंदी टिकेकर यांच्या स्वरांनी नाटकाला एक वेगळा साज चढवला आहे.

चपखल पात्रयोजना हे या नाटकाचं वैशिष्ट्य. समंजस, विचारी, कल्पनेच्या प्रांगणात मुक्त विहार करणारी, आपल्यासह आपल्या जवळच्यांचा समत्वानं विचार करणारी दीदीराजे शृजा प्रभुदेसाई यांनी विवेकानं सादर केली आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ते ठाशीवपणे जाणवतं. याउलट, बेबीराजेंच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकरांनी तडकभडक, स्पष्टवक्ती, आपल्या मनाला येईल तसं बिनधास्त वागणारी राजकन्या सहजसुंदर शैलीत साकारली आहे. डॉक्टर पटवर्धन झालेले विद्याधर जोशी गमतीशीर, सीन्सिअर, राजकुटुंबातील मुलांवर मातृवत प्रेम करणारे, भावनाशील असे आहेत. भावनोत्कट प्रसंगांत ते उत्कटतेनं व्यक्त होतात. महाराजांच्या भूमिकेत लयास गेलेल्या संस्थानिकांचा न गेलेला ताठा आणि गुर्मी मग्रुरपणे अभिजीत चव्हाण यांनी दर्शविली आहे. कोणत्याही परिस्थितीत वाकायचं नाही हा त्यांचा बाणा त्यांच्या अवघ्या देहबोलीतून व्यक्त होतो. आस्वाद काळे यांचा कवी संजय दिलखुलास… काव्य जगणं आणि व्यवहाराची त्याच्याशी सांगड घालणं त्यांनी समजदारीनं केलं आहे. माणसाच्या जगण्याला पंख फुटायचे असतील तर आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे, हे ते दीदीराजेंना पटवून देतात. अमोल बावडेकरांचा सुरेश लक्षवेधी. आपल्या गाण्यानं आणि सलज्ज बावळटपणाने त्यांनी या भूमिकेत छाप पाडली आहे. श्रुती पाटील यांनी दीदीराजेंची बोलघेवडी चुलतबहीण मेनका आकर्षकरीत्या पेश केली आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्या-वावरण्यात भोचकपणाचा अंश डोकावतो. सृजन देशपांडे (राजेंद्र) आणि विराजस ओढेकर (प्रताप) यांनी वडलांपुढे दबलेले, स्वत:चं कसलंच व्यक्तिमत्त्व नसलेले राजपुत्र नेमकेपणाने उभे केले आहेत.

एकुणात, पुलं मॅजिकचा प्रत्यय देणारं ‘सुंदर मी होणार’ प्रेक्षकांना चार घटका निश्चितच रिझवतं.