राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘डान्स दीवाने’च्या सेटवर १८ क्रू मेंबर्सना करोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोचे अभिनेत्री माधुरी दीक्षित, कोरिओग्राफर धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. तर राघव जुयाल या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करोना झालेल्या १८ जणांवर सध्या उपचार सुरु असून सेटवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच शोचे चित्रीकरण थांबू नये म्हणून अन्य १८ जणांची निवड करण्यात आली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्पलॉइजचे जनरल सेक्रेटरी अशोक उपाध्ये यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘सेटवर ज्या लोकांना करोनाची लागण झाली आहे ते लवकर बरे होऊ देत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. नेहमी शोच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याआधी प्रत्येकाची करोना चाचणी केली जाते. करोना पॉझिटीव्ह असलेल्या क्रू मेंबर्सची चाचणी निगेटीव्ह येताच त्यांना पुन्हा काम करण्यास सांगण्यात येणार आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आर माधवन, आमिर खान, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, फातिमा सना शेख, विक्रांत मेस्सी, सतीश कौशीक यांना करोनाचा संसर्ग झाला होता.