मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. २ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, चला हवा येऊ द्यामधील कलाकार निलेश साबळने पोस्ट शेअर करत धक्का बसल्याचे सांगितले आहे.

निलेश साबळेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रमेश देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत काही दिवसांमध्ये चला हवा येऊ द्यामध्ये ते येणार होते असे म्हटले आहे. “मोठा माणूस ! या वयातही आम्हाला लाजवेल हा उत्साह आणि शेवट पर्यंत कलाकार म्हणून काम करण्याची इच्छा.हे आम्ही आत्ताच २७ जानेवारीला अनुभवलं. सरांनी ‘हे तर काहीच नाय’ मध्ये येवून आम्हाला आर्शीवाद दिला . सगळंच स्वप्नवत. त्यांच्या आयुष्यातले मंतरलेले किस्से त्यांनी सांगून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तोंडभरून कौतुक केलं. त्या दिवशी खरंच माणसातल्या ‘देवाला’ भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला” असे निलेश साबळेने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे तो म्हणाला, “पुढच्याच आठवड्यात ‘चला हवा येवू द्या’मध्ये संपूर्ण कुंटुंबासह ते येणार होते.आत्ता बातमी ऐकून खरंच काही सुचत नाही अशी आमची सर्वांचीच अवस्था झाली आहे . पण २७ तारखेचा तो संपूर्ण दिवस तुमच्या जवळ आम्हाला वावरता आलं , कलाकारातला माणूस कसा असावा आणि किती मोठा असावा याचा अनुभव आम्हाला आला .देव साहेब आपण खरंच ग्रेट आहात , आणि नेहमी रहाल.”

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या १९६२ साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.