मराठी प्रेक्षकांना नाटकांची आवड आहे, याची प्रचिती मराठी नाटकांच्या प्रयोगावरून आणि नवनवीन नाटकांच्या घोषणेवरून दिसून येते. आता लवकरच एक नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणआर आहे. या नाटकाचं नाव ‘ठरलंय FOREVER’ असं आहे.
‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या लोकप्रिय नाटकातील भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ऋषी मनोहर आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. अलीकडे ‘कन्नी’ (२०२४) चित्रपटातील भूषणच्या भूमिकेनं त्याला नवा आयाम दिला, तर नुकतंच त्यानं सतीश आळेकरांचं ‘महापूर’ रंगभूमीवर यशस्वीपणे सादर केलं आहे.
गेल्या दशकभर रंगभूमीवर सतत नवे प्रयोग करणाऱ्या ऋषीसमोर आता स्वतःचं नाटक आणण्याचं मोठं आव्हान आहे. ‘ठरलंय FOREVER’ या नाटकात द्विभाषिक संवाद, लाईव्ह म्युझिक आणि तरुणाईची बोली अशा प्रयोगांचा संगम दिसणार आहे. नाटकाचं नाव हटके असल्याने याचा विषयही हटके असेल असं दिसून येतंय, त्यामुळे ऋषी मनोहर प्रेक्षकांसाठी काय नवीन आणतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
“मी पारंपरिक चौकटीत बसणारं नाटक करायचं नाही असं ठरवलं होतं. हे नाटक धाडसी आहे आणि थेट तरुणाईच्या भाषेत संवाद साधतं,” असं ऋषी मनोहर सांगतो. ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणारं हे नाटक रंगभूमीवर नवा ताजेपणा आणेल, अशी अपेक्षा आहे.