मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच चित्रपटही गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी १९६० ते २००० पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. वयाच्या पाचव्या वर्षीच ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर तरुणपणी ‘असला नवरा नको गं बाई’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘बहुरूपी’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘खिचडी’ अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. या भूमिकेद्वारे त्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. आता पुन्हा एकदा त्या बायोपीकच्या रूपात मराठी रसिकांसमोर येणार आहे.

68th National Film Award : मराठीमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाने मारली बाजी, अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘रंजना – अनफोल्ड’ या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाची घोषणा आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन – कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. तर कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

VIDEO : “आम्ही सगळे परत येतोय…” पुन्हा सुरु होणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, वाचा कधी आणि केव्हा होणार प्रसारित?

‘रंजना – अनफोल्ड’ या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा प्रवास उलगडणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच ‘रंजना – अनफोल्ड’ हा चित्रपट पुढील वर्षी ३ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ranjana deshmukh biography ranjana unfold movie shooting start soon nrp