Aarpar Movie Trailer : मराठी सिनेसृष्टीतली ‘ब्युटी क्वीन’ म्हणून लोकप्रिय असलेली ऋता दुर्गुळे आणि हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा ललित प्रभाकर लवकरच एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘आरपार’. ‘आरपार’च्या निमित्ताने ललित-ऋताही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोघांच्या या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
‘आरपार’ सिनेमाचं पोस्टर आणि टीझर आल्यानंतर ही चर्चा आणखीनच वाढली. तेव्हापासूनच अनेक सिनेमाप्रेमी तसंच ऋता-ललितचे चाहते सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अशातच नुकताच ‘आरपार’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २ मिनिटं आणि ३९ सेकंदाच्या या ट्रेलरने चाहत्यांच्या मनात सिनेमाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
ट्रेलरमध्ये ऋता व ललित यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे; मात्र असं असलं तरी, त्यांच्या नात्यातील अनेक कंगोरेसुद्धा पाहायला मिळत आहे. त्यात गैरसमज, दूरावा, वाद आणि भांडण… हे सगळंच आहे. तसंच ट्रेलरमधून सिनेमातील गाण्यांची छोटीशी झलकही दाखवण्यात आली आहे.
‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ आणि ‘प्रेमात वेड लावायची ताकद असते फक्त पार्टनर चांगला मिळायला हवा’ अशा काही ओळी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. रोमँटिक कथा असलेल्या ‘आरपार’ या सिनेमात ललित व ऋताचा वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे.
ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर इन्स्टाग्राम पोस्ट
‘आरपार’ची खास गोष्ट म्हणजे, हा सिनेमा एक खास दिवशी प्रदर्शित होणार आहे, हा दिवस म्हणजे १२ सप्टेंबर. ललित आणि ऋता या दोघांच्याही वाढदिवस १२ सप्टेंबर रोजी असतो आणि याच खास दिवशी ‘आरपार’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं दोघांसाठीही ही आनंदाची बाब आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. तर सिनेमाचं संगीत गुलराज सिंहने केलं आहे. त्यामुळे प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा ऋता व ललित या नव्या जोडीच्या ‘आरपार’ सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिलीय, हे नक्की…