Chhaya Kadam in Trouble: सैराट, लापता लेडीज आणि ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाइट’ या चित्रपटातून देशपातळीवर ओळख मिळवलेल्या अभिनेत्री छाया कदम सध्या वादात अडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी रानडुक्कर, ससा आणि घोरपडीचं मांस खाल्ल्याचा दावा केला होता. वन कायद्यानुसार संरक्षित प्रजातीच्या वन्य प्राण्यांना मारणं आणि त्यांचं मांस खाणं कायद्यानं गुन्हा मानलं जातं. छाया कदम यांच्या दाव्यानंतर मुंबईतील एक स्वयंसेवी संस्थेनं महाराष्ट्र वन विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर वन विभाग आता छाया कदम यांची चौकशी करणार आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, प्लांट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी (PAWS) या संस्थेनं ठाण्यातील वनसंरक्षक आणि विभागीय वन अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. छाया कदम यांनी एका मुलाखती दरम्यान वन्य प्राण्यांचं मांस खाल्ल्याचा दावा केला होता. या विधानावर आधारित ही तक्रार करण्यात आली. छाया कदम यांनी हरीण, ससा, रानडुक्कर, घोरपड यांचे मांस खाल्ल्याचा दावा केला होता. या प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित करण्यात आल्या आहेत.
स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर वन विभागानं अधिकृतरित्या चौकशी सुरू केली आहे. वन्यजीव प्राण्यांची शिकार आणि त्यांचे मांस भक्षण केल्याबद्दल अभिनेत्री छाया कदम आणि इतरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
विशेष पथकाची नेमणूक
सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वन विभागाकडून विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वन्य प्राण्यांचे मांस मिळवून देण्यात मदत करणाऱ्या शिकाऱ्यांचाही शोध या पथकाकडून घेतला जाणार आहे. तपास अधिकारी राकेश भोईर यांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले, “आम्ही छाया कदम यांच्याशी संपर्क साधला होता. त्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. चार दिवसांनी त्या परतणार आहेत. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर त्या आमच्यासमोर चौकशीसाठी हजर राहतील, असे त्यांनी आम्हाला कळवले आहे.”
तपास अधिकारी मांसाची शिकार करणाऱ्या किंवा त्याचा पुरवठा करणाऱ्या लोकांचा शोध घेण्याचे काम करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही भोईर यांनी सांगितले.