अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे. बालकलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आदिनाथने आत्तापर्यंत अनेक सुपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अद्याप त्याने स्वत:चा कोणताही चित्रपट बघितला नाही. एका मुलाखतीत आदिनाथने यामागच कारण सांगितलं आहे.
हेही वाचा- सार्वजनिक ठिकाणी किस केलंय का? आदिनाथ कोठारेने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाला, “भारतात…”
लोकमत फिल्मी’ला आदिनाथने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या करिअरबरोबर खासगी आयुष्याचा खुलासा केला आहे. आदिनाथ म्हणाला, “मी माझे चित्रपट कधीच बघत नाही. मला माझ्या प्रत्येक भूमिकेबाबत असं वाटतं की हे थोडं अजून चांगलं करता आलं असतं. मला ओसीडी आहे. त्यामुळे मी माझे कोणतेच काम सलग बघत नाही. चित्रपट असो किंवा वेबसिरीज मी कधीच पूर्ण बघत नाही.”
दरम्यान आदिनाथ कोठारेच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्याने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. फक्त मराठी मालिका आणि चित्रपट नव्हे तर बॉलीवूड चित्रपटातही तो झळकला. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटात तो झळकला. या चित्रपटात त्याने क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारली होती. तसेच ‘पाणी’ हा आदिनाथ कोठारेने दिग्दर्शन केलेला पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याबरोबरच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.