गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘हर हर महादेव’ या चित्रपटानंतर आता अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रावरंभा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून अभिनेता शंतनू मोघे पुन्हा एकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या ट्रेलरची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभे करताना निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची मोलाची साथ लाभली. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही, तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती?
‘रावरंभा’ यांचं नुकतंच फुलत आलेलं प्रेम, त्यातच स्वराज्यावर चालून आलेलं संकट ‘राव’ कसा परतवून लावतो? हे देखील यात पाहायला मिळणार आहे. ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेता शंतनू मोघे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्या पात्राचे कौतुक केले जात आहे.
‘रावरंभा’ हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ येत्या १२ मे रोजी मराठी रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेमासाठी केलेला त्याग, संघर्ष आपल्याला भावतो. अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत.
अभिनेता अशोक समर्थ हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकारांच्या ही भूमिका आहेत.