‘रानबाजार’ फेम अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार हिच्या भावाचे निधन झाले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. माधुरीच्या भावाचे १२ दिवसांपूर्वी निधन झाले. भावाच्या अचानक जाण्याने माधुरी आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिने पोस्टमध्ये भावाने केलेल्या मदतीचा व त्याच्या स्वप्नांचा उल्लेख केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरीने लिहिलं, “प्रिय अक्षय,

तुला जाऊन १२ दिवस झाले…हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही…उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, असं आपण बऱ्याचदा म्हणतो..खरंय उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखःद घटना घडण्यापासून थांबवू शकले असते. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की तू नाहीयेस ही कल्पनाच सहन होत नाहीये. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. मला तुझा खूप आधार वाटायचा. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरू करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी ‘नाही’ असं बोलला नाहीस. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही कामाला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतंस. कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास. कायम स्वतःपेक्षा बहिणींच्या कामाला प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल.”

पुढे ती म्हणाली, “तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं, ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झालीच नाही. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्षे रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनाचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण दिवाळीतील भाऊबीज आठवून जास्त त्रास होतोय. एका सावलीसारखा तू सोबत असायचा. पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?” यावेळी माधुरीने भावाची सर्व स्वप्ने पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, माधुरीच्या भावाचं आकस्मिक निधन झालं आहे. माधुरीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी कमेंट करून अक्षयला श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dancer madhuri pawar brother akshay passed away actress shared emotional post hrc