‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. नुकतचं केदार शिंदे यांनी मराठी चि्त्रपटाला स्क्रीन का मिळत नाहीत यावर आपलं मत मांडलं आहे.
एका मुलाखतीत केदार शिंदे यांना मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत? प्रेक्षक येत नाहीत अशी ओरड पुन्हा होणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना केदार शिंदे म्हणाले, “होणार. दोन महिन्यांपूर्वी मी ही अशीच ओरड केली होती. पण बाईपणमुळे मला काही गोष्टी समजल्या. अनेक चित्रपटगृहांमध्ये गेलो. महाराष्ट्रभर फिरलो. चित्रपटाच्या तिकिटातून चित्रपटगृहांची कमाई होत नाही. त्यांची कमाई पॉपकॉर्न, समोसे, सॉफ्ट ड्रिंक विकल्यामुळे होते.त्यामुळे ज्या चित्रपटाला जास्त प्रेक्षक येतात त्या चित्रपटाचे पुढील शो कायम राहतात. पण महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्समधील एक स्क्रिन मराठी चित्रपटांसाठी राखीव असावी असं मला वाटतं.”
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. महिलांवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला पुरुष वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाततीत या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या वेड चित्रपटालाही मागे टाकले आहे.