Gashmeer Mahajani Wish To Join Bigg Boss : मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘देऊळबंद’, ‘कॅरी व मराठा’, ‘कान्हा’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ तसंच ‘फुलवंती’ यांसारख्या चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मलिका, सिनेमाशिवाय गश्मीरने रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. ‘झलक दिखला जा’ आणि ‘खतरों के खिलाडी’सारख्या शोमधूनही त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘खतरों के खिलाडी’ शोच्या १४ व्या सीझनमध्ये तो टॉप ५ मध्ये पोहचला होता, पण त्याचं विजेतेपद थोडक्यासाठी हुकलं होतं.

डान्स आणि कठीण टास्क असलेल्या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गश्मीरने आता ‘बिग बॉस’मध्येही जायची इच्छा व्यक्त केली आहे. गश्मीरने आपल्या सोशल मीडियाद्वारे स्वत:च याबद्दल सांगितलं आहे.

अभिनय, नृत्य आणि आपल्या फिटनेससाठी कायमच चर्चेत असणारा गश्मीर सोशल मीडियावरसुद्धा तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. तसंच अनेकदा त्यांच्याशी संवादही साधतो.

अशातच इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने ‘Ask Gash’ हा खास सेगमेंटद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. त्याने चाहत्यांच्या दिलखुलास प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याला एका चाहत्याने ‘बिग बॉस’मधील सहभागाबद्दल प्रश्न विचारला. ‘गश्मीर, तू ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचा विचार केला आहेस का?’ असा प्रश्न चाहत्याने अभिनेत्याला विचारला.

चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत गश्मीर म्हणतो, “हो! नक्कीच, मला ते करायचं आहे.” दरम्यान, गश्मीरने त्याची ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, यातून त्याने हिंदी किंवा मराठी बिग बॉस असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता गश्मीर कोणत्या ‘बिग बॉस’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम स्टोरी

गश्मीरने याआधी काही हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे, त्यामुळे तो हिंदी ‘बिग बॉस’मधूनतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही ना, अशी शक्यताही अनेकांना आहे. दरम्यान, गश्मीरने गेल्यावर्षी प्राजक्ता माळीबरोबर ‘फुलवंती’ नावाचा सिनेमा केला. या सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं चाहत्यांनी कौतुक केलं.