Genelia Deshmukh Special Post For Mother In Law : रितेश व जिनिलीया देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. रितेशच्या कुटुंबीयांशी जिनिलीयाचं फार सुंदर नातं आहे. अभिनेत्याचे वडील विलासराव देशमुख जिनिलीयाला आपल्या मुलीप्रमाणे मानायचे. तसेच रितेशच्या आईबरोबर सुद्धा जिनिलीयाचं खूप छान बॉण्डिंग आहे. बऱ्याच फोटो अन् व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना या देशमुख सासू-सुनेचं सुंदर नातं पाहायला मिळतं.

देशमुख कुटुंबीयांमध्ये कोणाचाही वाढदिवस असो किंवा खास कार्यक्रम…जिनिलीया सर्वांना आवर्जून शुभेच्छा देत असते. आज ( १० ऑक्टोबर ) लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सासूबाई वैशाली देशमुख यांच्या वाढदिवशी जिनिलीयाने परफेक्ट फॅमिली फोटो शेअर केला आहे. यातील पहिल्या फोटोमध्ये वैशाली देशमुख व त्यांच्या नातवंडांनी एकत्र फोटो काढल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं रियान व राहील तसेच अभिनेत्याचे बंधू धीरज देशमुखांच्या मुलांची झलक दिसतेय. दुसऱ्या फोटोमध्ये रितेश जिनिलीया पारंपरिक लूकमध्ये फोटोसाठी पोज देत असल्याचं पाहायला मिळतंय.

रितेशची दोन्ही मुलं वैशाली देशमुख यांना ‘आजीमा’ अशी हाक मारतात. तर, तिन्ही मुलं आणि सुना त्यांना ‘आई’ म्हणतात. जिनिलीयाने सासुबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टचं कॅप्शन वाचून याचा खुलासा झाला आहे. अभिनेत्री लिहिते, “आम्हा सगळ्यांच्या लाडक्या… आजीमा, आई!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! We Love You !!”

जिनिलीयाने शेअर केलेल्या या फॅमिली फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “ग्रेट फॅमिली फोटो”, “खूप शुभेच्छा आईसाहेब…आवडतं व्यक्तिमत्त्व”, “किती सुंदर फोटो आहे”, “कुटुंबाला जोडून ठेवणारी व्यक्ती”, “कुटुंब असावं तर असं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोवर दिल्या आहेत.

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दोघेही सध्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हा या दोघांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रितेश या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून यामध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. हा ऐतिहासिक सिनेमा पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.