मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच त्यांना २०२३ या वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट शेअर करत याबाबतची घोषणा केली. या घोषणनेनंतर अशोक सराफांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर राजकीय नेते तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत अशोक सराफांचे अभिनंदन केले आहे. मराठमोळी अभिनेत्री हेंमागी कवीनेही इन्स्टाग्रामवर अशोक सराफांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. हेमांगीने अशोक सराफांबरोबर एका नाटकात काम केले होते. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये अशोक सराफांबरोबरच्या जुन्या आठणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा- “तुला २ लाथा आणि…” मेघा घाडगेने खरमरीत पोस्ट शेअर करत पुष्कर जोगला सुनावले खडेबोल

हेमांगीने पोस्टमध्ये लिहिले “महाराष्ट्र भूषण! खूप खूप अभिनंदन भाई! पुरस्कार तुम्हांला मिळालाय पण उर आमचा भरून आलाय! एक अख्खी पिढी तुम्हांला बघत मोठी झालीए आणि अजून ही तुम्हांला पाहीलं की आमच्या काळातला ‘The Superstar’ म्हणून छाती फुगवून घेतोय! एवढ्या ताकदीचं काम करून ठेवलंय तुम्ही! आज तुम्हांला ‘महाराष्ट्र भूषण’ घोषित केलं, आम्हांलाच आनंद झालाय! महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार! २००४ साली तुमच्या सोबत नाटकात काम करायचा बहुमान मला मिळाला होता. अनाधिकृतचे ते मंतरलेले ६ महिने मी कधीच विसरणार नाही!” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत अशोक सराफांचे अभिनंदन केले आहे..

अशोक सराफांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, बाळाचे बाप ब्रम्हचारी, माझा पती करोडपती चित्रपटांमधील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. केवळ विनोदीच नाही तर त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही अशोक सराफांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.