Hemant Dhome and Kshiti Jog Viral Video : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते. मनोरंजनसृष्टीत काम करता करता ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. हेमंत व क्षिती यांनी २०१२ मध्ये एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला जवळपास १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
काही दिवसांपूर्वी हेमंत आणि क्षिती यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हेमंत त्याच्या लग्नाचा उल्लेख करत असा म्हणतो की, क्षिती आणि माझ्या लग्नाला आता जवळपास १२ वर्षे झाली आहेत…” त्याचं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच क्षिती मोठ्याने तेरा वर्षे झालीत असं म्हणते. क्षितीच्या या उत्तरानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकतो, तर स्वत: हेमंतलासुद्धा हसू आवरत नाही.
लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या ‘आमने सामने’ नाटकाच्या एका प्रयोगावेळी हा प्रसंग घडला. ‘आमने सामने’ या नाटकाच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओची तेव्हा सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. आता दोन महिन्यांनी या व्हिडीओवर हेमंतने स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
झी मराठीवर आम्ही सारे खवय्येच्या नव्या सीझनमध्ये हेमंत आणि क्षिती सहभागी झाले होते. तेव्हा संकर्षणने त्याला या व्हिडीओवरून प्रश्न विचारला. तुमच्या लग्नाला नेमके किती वर्ष झाले आहेत असा प्रश्न संकर्षणने हेमंतला केला. तेव्हा याचं उत्तर देत हेमंत म्हणाला, “आमच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि येत्या डिसेंबरमध्ये १३ वर्षे पूर्ण होणार आहेत. आम्हाला भेटून १३ वर्षे झाली आहेत. तर तेव्हा मी असं म्हणालो की, आम्हाला १२ वर्षे झालीयत, तर क्षितीने तिथे लोकांमध्ये अपमान केला.”
यानंतर क्षिती म्हणाली, “मला असं वाटलं की भेटून किती वर्षे झाली आहेत, म्हणून मी तेव्हा १३ म्हणाले होते. मग माझ्या लक्षात आलं की, नाही १२ वर्षेच बरोबर आहेत; म्हणजे आमच्या लग्नाला तर १२ वर्षच झाले आहेत. मी १३ म्हणाले… हे माझं चुकलंच, पण लग्नाला नक्की किती वर्षे झाली आहेत, हे हेमंतलं घरी जाऊन चार दिवसांनी आठवलं. तो तेव्हा मला म्हणाला की, खरंतर मी बरोबर बोललो होतो, पण मी जर १५ वर्षे झाली आहेत असं म्हणाले असते आणि मी टेक लावून धरलं असतं तरी त्याने ते मान्य केलं असतं.