Fussclass Dabhade Box Office Collection : मराठी कलाविश्वात सध्या ‘फसक्लास दाभाडे’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा चालू आहे. कौटुंबिक गोष्ट, बहीण-भावंडांचं प्रेम, वाद, संपूर्ण कुटुंबाला सामावून घेणार आई, लग्नघर या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळाल्या. २४ जानेवारीला हा कौटुंबिक सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि बघता-बघता ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’प्रमाणे हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या नव्या सिनेमाला सुद्धा प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

गेल्या वर्षात एकाही मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केलेली नव्हती. त्यामुळे आता ‘फसक्लास दाभाडे’ची जादू चालणार की नाही याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी ‘फसक्लास दाभाडे’च्या टीमने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

२४ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘फसक्लास दाभाडे’ने तीन दिवसात २.०१ कोटी कमावले आहेत. त्यामुळे हा वीकेंड हेमंतच्या सिनेमासाठी सुपरहिट ठरला आहे. “तिकीटबारीवरच्या मरगळीची, निरूत्साहाची, नकारात्मकतेची साखळी तोडतोय…ही तर सुरूवात आहे…ज्या ज्या प्रेक्षकांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला त्या तमाम प्रेक्षकांचे खूप खूप आभार! यळकोट यळकोट जय मल्हार!” असं म्हणत हेमंतने हे बॉक्स ऑफिस कलेक्शन सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

हेमंतने बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी शेअर करताच यावर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता येत्या काही दिवसांत हा सिनेमा किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान,  शुक्रवारी ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाच्या टीमने स्वतंत्ररित्या आपल्या चित्रपटासाठी फक्त प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटगृहात ११२ रुपयांत तिकिट प्रेक्षकांना देऊ केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटगृहात ‘फसक्लास दाभाडे’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हाऊसफुल गर्दी केली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant dhome fussclass dabhade movie weekend box office collection housefull shows running in maharashtra sva 00