Kedar Shinde Reaction Zapuk Zupuk Failure : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपले नाव कोरलं. सोशल मीडियावर आपल्या अतरंगी व्हिडीओमुळे चर्चेत असणारा सूरज ‘बिग बॉस मराठी’नंतर आणखीनच प्रसिद्धी झोतात आला. या शोमध्ये त्याला सुरुवातीला खेळ कळला नाही; मात्र नंतर तो या शोच्या विजेतेपदाचा दावेदार ठरला होता.
‘बिग बॉस मराठी ५’च्या महाअंतिम सोहळ्यात सूरज चव्हाण विजयी होताच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडून एक घोषणा करण्यात आली, ती म्हणजे त्याला घेऊन चित्रपट करणार असल्याची. ‘बिग बॉस मराठी ५’च्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी त्याला घेऊन ‘झापुक झुपूक’ चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आणि तेव्हापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती.
सूरजसारख्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या मुलाला एवढी मोठी संधी मिळतेय, हे पाहून अवघा महाराष्ट्र खूश होता. अनेकजण त्यांचं कौतुक करत होते. त्यामुळे त्याच्या ‘झापुक झुपूक’चीसुद्धा बरीच चर्चा झाली होती. मात्र तिकीटबारीवर सूरजचा हा चित्रपट फार कमाई करू शकला नाही. ‘बिग बॉस’च्यावेळी प्रेम केलेल्या प्रेक्षकांनी त्याच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाकडे पाठ फिरवली.
यबद्दल केदार शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ का चालला नाही? याबद्दलचं नेमकं कारण सांगितलं. याबद्दल मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला वाटतं कदाचित माझ्यात, माझ्या विचारांत काहीतरी खोट असेल. सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही. त्यांना तो (सूरज चव्हाण) अभिनेता बघायचाच नसेल. त्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली. ओके.”
यापुढे केदार शिंदे म्हणतात, “मूल जन्माला घातल्यानंतर दहा दिवसांनी आपल्याला कळतं की, त्याचा मृत्यू झाला आहे; तेव्हा जे दु:ख होईल तेच दु:ख आपल्या एखाद्या कलाकृतीचं असं झाल्यानंतरही होईल. ते दहा दिवस अत्यंत त्रासदायक असतात आणि त्याचा हा त्रास होणारच. म्हणून आपण हा विचार नाही करू शकत की, समोरच्याला काही अक्कलच नाही. समोरच्यांना जास्त अक्कल होती, ज्यांनी मला नाकारलं. आता त्यांच्या मनात मी माझी जागा कशी निर्माण करणार, याचे प्रयत्न मी सुरू केले आहेत.”
केदार शिंदे इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर केदार शिंदेंनी असं म्हटलं की, “माझा कोणताच दावा नाही किंवा कोणताच आत्मविश्वास नाही की, आता मी जे करत आहे ते लोकांना आवडेल. मात्र मी एक निरीक्षण केलं आहे की, जी गोष्ट मी त्यात केली होती, ती आता यात करणार नाही. बाकी यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही. ‘बाईपण भारी देवा’ केला आणि त्यासारखंच आता पुन्हा करू असं होऊ शकत नाही. मला एक कथा मिळाली आहे.”