Kedar Shinde Recall Kranti Redkar Accident Scene : मराठीमध्ये असे अनेक विनोदी चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. या चित्रपटांची जादू आजही महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर कायम आहे. असाच एक विनोदी चित्रपट म्हणजे ‘जत्रा’. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर आणि प्रिया बेर्डे यांच्यासह कुशल बद्रिके, संजय खापरे, रमेश वाणी यांसारख्या अनेक कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका होत्या.

‘जत्रा’ हा सिनेमा आजही एक ‘कल्ट सिनेमा’ म्हणून ओळखला जातो. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं होतं. जत्रा हा एक विनोदी सिनेमा असून या सिनेमाच्या सेटवर तेव्हा अनेक गमतीजमती झाल्या होत्या. मात्र एक घटना अशी घडली होती, ज्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता आणि ही घटना म्हणजे क्रांती रेडरकचा अपघात.

सेटवर अचानक पाऊस सुरू झाल्याने केदार शिंदेंनी शूटिंग थांबवलं. त्यानंतर टीममधील काहीजण पाचगणीला जात होते, ज्यात क्रांती रेडकरसुद्धा होती. पण केदार शिंदेंनी तिला निरोप देत जाऊ नये असं म्हटलं आणि मोठा अनर्थ टळला. याबद्दल स्वत: केदार शिंदेंनीच सांगितलं आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदेंनी जुना प्रसंग सांगितला.

याबद्दल केदार असं म्हणाले, “अचानक पाऊस पडल्याने आम्ही पॅकअप केलं. त्या दुपारी काही जणांना असं वाटलं की पाचगणी जाऊन मज्जा करावी. त्यात क्रांती होती. दोन गाड्या होत्या आणि मला कसंही करून तिला जाण्यापासून थांबवायचं होतं. मग घाटात ती पुढच्या गाडीतून उतरली आणि मागच्या गाडीत येऊन बसली आणि ती गाडी यूटर्न मारून पुन्हा आली. पुढे जाऊन त्या पुढच्या गाडीचा अपघात झाला.”

यापुढे केदार म्हणाले, “त्या गाडीतल्या लोकांना प्रचंड लागलं होतं. मला तेव्हा माहित नाही कसं सुचलं की, मी क्रांतीला जाण्यापासून अडवावं. स्वामींचीच कृपा असेल की, मी तिला निरोप पोहोचवला आणि ती त्या गाडीतून उतरली.”

क्रांती रेडकर इन्स्टाग्राम व्हिडीओ

यानंतर क्रांती या घटनेबद्दल म्हणाली, “माझ्या सीटवर जो बसला होता. त्याच्या संपूर्ण चेहऱ्याला ६२ टाके पडले आणि त्याचे सगळे दात घशात गेले होते. त्यानंतर माझं अभिनेत्री म्हणून करिअरच संपलं असतं. कारण संपूर्ण चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. तो मुलगा मागच्या गाडीत होता, तो येऊन म्हणाला की तुला मागच्या गाडीत बसायला बोलावलंय. मी उतरले आणि तो माझ्या जागेवर जाऊन बसला. त्यानंतर जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा त्याने क्रांती कशी आहे? असं विचारलं, तो विसरला होता की, मी त्या गाडीतून उतरले होते.”

केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित ‘जत्रा’ हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. आजही या सिनेमातील संवाद लोकप्रिय आहेत. शिवाय अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली ‘कोंबडी पळाली’ आणि ‘ये गो ये ये मैना’ ही लोकप्रिय गाणीसुद्धा तुफान गाजली.