Gashmeer Mahajani’s upcoming film: अभिनेता गश्मीर महाजनी हा त्याच्या एकापेक्षा एक भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘देऊळ बंद’ या मराठी सिनेमापासून ते ‘इमली’ या हिंदी मालिकेतील त्याच्या भूमिकेपर्यंत त्याच्या सर्व भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसते.
त्याच्या ‘फुलवंती’ या सिनेमातील गश्मीरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. आता प्रेक्षकांना तो पुन्हा कधी पडद्यावर दिसणार, याची उत्सुकता लागलेली आहे.
गश्मीर महाजनी अनेकदा सोशल मीडियावर आस्क गश (ASK GASH) या सेशनमध्ये चाहत्यांबरोबर गप्पा मारतो. चाहते त्याला अनेक प्रश्न विचारतात. त्याच्या खासगी आयुष्यापासून ते त्याच्या करिअर, त्याच्या भूमिका, आगामी काळातील चित्रपट अशा अनेक विषयांवर चाहते त्याला प्रश्न विचारतात. इतकेच नाही, तर अनेकदा चाहते त्याला त्याच्या आयुष्यातील काही अडचणींबाबत सल्ले विचारतानादेखील दिसतात.
गश्मीर महाजनीचा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
आता नुकताच गश्मीरला एका चाहत्याने विचारले की, तुझा पुढचा मराठी चित्रपट कधी येणार आहे? त्यावर गश्मीरने उत्तर दिले की, माझ्या पुढच्या मराठी चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आणखी एका चाहत्याने विचारले की, तू आणखी चित्रपट का करीत नाहीस? तू सतत दिसत राहा. आम्हा प्रेक्षकांना तू सतत दिसला पाहिजेस. त्यावर गश्मीर म्हणाला, “चांगला चित्रपट करू की मग सतत दिसत राहू? तुम्ही सांगा.
एक चाहता गश्मीरला म्हणाला की, तू तुझ्या चाहत्यांना विसरला आहेस. त्यावर गश्मीरने उत्तर देत लिहिले, “नाही. मी माझ्या चाहत्यांना विसरलेलो नाही. मी माझ्या चाहत्यांसाठी काहीतरी खास बनवत आहे. सोशल मीडियावर रोज बिनअर्थाच्या पोस्ट बघण्यापेक्षा चित्रपटगृहात तुम्ही माझा चित्रपट पाहा. चाहते गश्मीरला अनेकविध प्रश्न विचारताना दिसतात आणि गश्मीरदेखील त्याची उत्तरे देत असतो.
आता गश्मीर कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, चित्रपटाचे नाव काय असणार आणि चित्रपटात त्याच्याबरोबर कोणते कलाकार दिसणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गश्मीर महाजनी काही वेब सीरिजमध्येदेखील दिसला आहे. तसेच, तो खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येदेखील स्पर्धक म्हणून दिसला होता. त्या शोमध्ये त्याने ज्या पद्धतीने स्टंट केले, त्यामुळे त्याने चाहत्यांची मने जिंकली होती. आता गश्मीरला नवीन भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.