हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक चित्रपटगृहांवर हाउसफुलची पाटी लागली असून अवघ्या काही दिवसांमध्ये ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाने २ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता अमेय वाघ, राजसी भावे, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, क्षिती जोग, हरीश दुधाडे, निवेदिता सराफ, राजन भिसे असे तगडे कलाकार मंडळी झळकले आहेत. नुकतीच लोकप्रिय लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुगंधा कुलकर्णीने ‘फलक्लास दाभाडे’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करत ही पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे की, काल ‘फसक्लास दाभाडे’ पाहिला. या विषयाच्या निवडीसाठी हेमंत आणि क्षितीचं मनापासून अभिनंदन. तुमचा आमचा विषय, घरचा तरी; धाडसाचा. व्यक्तिशः मला खूप चित्रपट खूप आवडला. कुटुंब एक असलं तरी त्यात वेगळी माणसं असतात, नात्यांचा इतिहास असतो. एकच घटना कुटुंबातल्या वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम करून जाते. नाती बदलतात…तुटतात ..सुटतात, गाठी बसतात. थोडं सुख, थोडा आनंद, काही आठवणी घेऊन आपण मोठे होतो, बदलतो, तरी जोडलेलो राहतो कुटुंबाशी. अशीच गोष्ट आहे ‘फसक्लास दाभाडे’ची.

पुढे मधुगंधाने लिहिलं आहे, “स्क्रीनप्लेवर लेखकाची पकड जाणवते. खुसखुशीत संवाद संपूर्ण चित्रपटभर आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल ठेवतात. उत्तम दिग्दर्शन. हेमंतने व्यावसायिकतेच भान ठेवून जे म्हणायचं आहे, जे सांगावस वाटतं म्हणून आपण चित्रपट करतो ते अत्यंत कल्पकतेने आणि रंजन करत सांगितलेलं आहे. उषाताई, निवेदिता ताई, राजन सर, क्षिती, सिद्धार्थ, हरीश, अमेय, मिताली अशा एक से एक सरस मंडळींनी अप्रतिम कामं केली आहेतच. पण याा सगळ्यांमध्ये नवीन असूनही राजसी भावे, तृप्ती शेडगे यांनीही कमाल केली आहे. उत्कृष्ट कामगिरी. सिनेमॅटोग्राफर सत्याने आम्हाला दाभाडे फॅमिलीमध्ये नेऊन ठेवलं. आपल्या समोर घडतं आहे असं वाटतं. जबरदस्त काम केलं आहे.”

“मी गाणी गुणगुणत बाहेर पडले…येलो येलो…आणि मनाला लायटिंग…ही दोन गाणी रेंगाळत राहतात. कपडे सुंदर दिसण्यासाठी नसून …खरी पात्र वाटावीत यासाठी आहेत हे कळतं. सगळं चांगलं जुळून आलं की चित्रपट रंजक आणि चांगला होतो…तसा हा झाला आहे. रंजन करत असताना विचार सुद्धा करायला लावणारी जी मोजकी मंडळी आहेत त्यामध्ये हेमंत आणि क्षितीचं नाव महत्वाचं आहे.”

“मराठी माणूस, मराठी प्रेक्षक म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की, एखाद्याला एखादा सिनेमा आवडतो, एखाद्याला नाही आवडतं. वैयक्तिक आवडी निवडी असतातच पण आपण आपलं मत सिनेमा बघून बनवावं. समीक्षा ही तटस्थ असायला हवी, बरेचदा ती नसते. चित्रपट, चित्रपटगृहात असताना, त्या सिनेमाला, दिग्दर्शकाला झोडून काढणं, त्याबद्दल वाईट लिहून बोलून मराठी प्रेक्षक तुटतो…आपल्या मातीतल्या गोष्टी मोठ्या पडद्यावर आल्या पाहिजेत…’ॲनिमल’ आणि ‘पुष्पा’ असे आपले हिरो गोष्टी आहेत का? आपल्याकडे दर्जा नाही कारण तेवढा प्रेक्षकवर्ग नाही. सुधारणा सिनेमामध्येपण झाली पाहिजे पण त्यासाठी आपला प्रेक्षक वर्गही वाढला पाहिजे हेच सत्य आहे. आपण दाक्षिणात्य सिनेमांचे, त्यांच्या दर्जाचे दाखले देताना त्यांच्या प्रेक्षकांची चित्रपटांवरची अपार श्रद्धा विसरतो. तर, ‘फसक्लास दाभाडे’ अवश्य बघा!”, असं मधुगंधाने लिहिली आहे. मधुगंधा कुलकर्णीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

दरम्यान, मधुगंधा कुलकर्णीच्या या पोस्टवर ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, अमेय वाघ यांनी मधुगंधाने आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhugandha kulkarni passed hemant dhome movie fussclass dabhade pps