Marathi Actor Aniket Vishwasrao : मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा बहुरंगी अभिनेता म्हणून अनिकेत विश्वासरावला ओळखलं जातं. अनिकेत मध्यंतरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. काही वर्षांपूर्वी अनिकेतने स्नेहा चव्हाणशी लग्न केलं होतं पण, पुढे दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. स्नेहाने अनिकेत व त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. आयुष्यातील या कठीण काळाबाबत अनिकेतने नुकत्याच ‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
“इंडस्ट्रीत बरेच फटके खाल्ले” – अनिकेत विश्वासराव
अनिकेत विश्वासराव याबद्दल सांगतो, “जर तुम्ही सत्यासाठी लढत असाल, तर तुम्ही नक्कीच माणूस म्हणून पुढे जाता. या सगळ्या कठीण काळात तुमचा देवावर विश्वास असेल, तर तुम्ही आणखी खंबीर होता. अनिकेत संपला वगैरे या गोष्टी मी ‘ऊन-पाऊस’ मालिकेपासून ऐकत आलो आहो. हा ‘वन टाइम वंडर’ आहे, एक प्रोजेक्ट करेल मग गायब होईल या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. त्यामुळे कोण काय बोलतंय याचा मला फरक कधीच पडत नाही. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपण किती खंबीर आहोत, आपली किंमत काय आहे हे आपल्याला समजतं. मी या आयुष्यात व इंडस्ट्रीत बरेच फटके खाल्ले आहेत. त्यामुळे आता माझ्यात हा कणखरपणा आला आहे पण, माझ्यातला चांगुलपणा मी अजिबात कमी केलेला नाही.”
हेही वाचा : ‘अशी ही बनवाबनवी’चा सीक्वेल येणार का? सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “लक्ष्याशिवाय…”
अनिकेत विश्वासराव पुढे म्हणाला, “हे सगळं कर्म आहे…ज्यांनी माझ्याबरोबर चुकीच्या गोष्टी केल्या ते आता भोगत आहेत. मला या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास झाला पण, जे झालं त्याचा आनंदच आहे. मला वकिलाच्या रुपात एक चांगला मित्र सापडला. त्याने मला सांगितलं सत्यासाठी तुला लढायचंय ना आपण करूया…त्यानंतर हायकोर्टानेच अंतिम निर्णय दिला. नेहमी असं म्हटलं जातं शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण, मी म्हणतो कोर्टात जायचं. बिनधास्त जायचं, न्याय आहे.”
“आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवायचा. न्याय नक्की मिळतो” असं अनिकेत विश्वासरावने त्याच्या चाहत्यांना सांगितलं. दरम्यान, अनिकेत विश्वासराव सध्या नाटकात काम करत आहे. याशिवाय त्याचा ‘डंका’ हा चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd