सोशल मिडिया आणि ट्रोलिंग हे जणू काही एक समीकरणच झालं आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरी स्वत:चं नाव आणि चेहरा लपवून कलाकारांना ट्रोल करत असतात. एखाद्या चांगल्या गोष्टींचं कौतुक तर होतंच; मात्र कौतुकापेक्षा अधिक आता ट्रोलिंग होतं. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात; पण काही कलाकार या ट्रोलर्सना चांगलंच धारेवर धरतात.
काही दिवसांपूर्वी अभिनेता संतोष जुवेकरला ट्रोल करण्यात आलं. ‘छावा’ चित्रपटानिमित्ताने संतोषने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यावेळी त्याने अक्षय खन्नाकडे केलेलं दुर्लक्ष तसंच विकी कौशलबरोबरचे सांगितलेले मैत्रीचे किस्से, यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. तसंच गेल्या काही दिवसांपासून अभिनेते सचिन पिळगांवकर हेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.
सचिन पिळगांवकरांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या ट्रोलिंगला त्यांनी स्वत: कधी उत्तर दिलं नाही. पण त्यांच्या बाजूने एका मराठी अभिनेत्याने त्याची भूमिका व्यक्त केली आहे. अभिनेता भूषण पाटीलने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सचिन पिळगांवकर आणि मराठी कलाकारांना ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
भूषण पाटील इन्स्टाग्राम पोस्ट
अभिनेता भूषण पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो असं म्हणतो की, “आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू आहे, तो म्हणजे मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचा. नुकतंच सचिन पिळगांवकरांच्या मुलाखतींमधील काही कमेंट्स किंवा त्याआधी संतोष जुवेकरला ट्रोल केलं गेलं. मला माहीत नाही हे कोण करत आहे? हे जाणूनबुजून करत आहेत?”
यानंतर त्याने म्हटलं, “मला या ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत सांगायचं आहे की, तुमचे बाप जेव्हा डायपरमध्ये होते; तेव्हापासून हा माणूस अभिनय करत आहे. त्यामुळे ही बकवास बंद करा आणि कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वत:च्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या भल्याचं सांगतोय.”
याशिवाय भूषणने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “स्वतःच्या भाषेचा आणि कलाकारांचा आदर करायला शिका” असं म्हटलं आहे. भूषणने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अवधूत गुप्तेनेही कमेंट करत “खूप योग्य.. खूप छान भूषण” असं म्हटलं आहे. तसंच अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा भूषणच्या व्हिडीओला समर्थन देत त्याचं म्हणणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, भूषण पाटीलबद्दल सांगायचं झालं तर, ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमातून तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमात भूषणने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. भूषणला या सिनेमामुळे खूप लोकप्रियता मिळाली. या शिवाय तो ‘मनमौजी’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.