Dilip Prabhavalkar Shares Father’s Memory : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. तात्या विंचू, चिंची चेटकीण, चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे… या आणि अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या भूमिकांमधून त्यांनी दरवेळेस प्रेक्षकांसमोर नवे दिलीप प्रभावळकर आणले आहेत.
वयाची ८० पार केलेल्या दिलीप प्रभावळरांची एनर्जी आजच्या तरुणांना लाजवेल अशी आहे. आजवर नानाविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले दिलीप प्रभावळकर नुकतेच बाबुली या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या ‘दशावतार’ हा नवा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘दशवतार’ या सिनेमानिमित्त दिलीप प्रभावळकर अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत आणि या मुलाखतींमधून ते काही जुने किस्से, प्रसंग तसेच काही आठवणी शेअर करत आहेत. अशाच एका मुलाखतीत दिलीप प्रभावळकरांनी वडिलांबद्दची एक भावुक आठवण शेअर केली आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर आपल्या वडिलांची आठवण सांगत असं म्हणाले, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे. आई, वडील भाऊ आणि मी… असं आमचं चार जणांचं कुटुंब. मी सायन्सचा विद्यार्थी होतो आणि माझ्या धाकट्या भावाने इंजिनिअरिंग केलं होतं. त्यामुळे आम्ही दोघेही सायन्सवाले आणि माझ्या वडिलांनी आर्ट्सचं शिक्षण घेतलं होतं.”
यानंतर ते सांगतात, “मी अंधेरीला फार्मासिटीकल डिव्हिजनमध्ये केमिस्ट म्हणून नोकरीला होतो. त्याच काळात मी नाटक, चिमणराव मालिका आणि सिनेमा करत होतो आणि यात माझी धावपळ होत होती. तर हीच धावपळ बघून मला वडिलांनी यातच करिअर करण्यास सांगितलं. एकेदिवशी ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ‘गेले काही दिवस मी तुझी नाटक-सिनेमा करतानाची धावपळ बघतोय. तुला एक विचारतो, तू यातच करिअर का करत नाहीस?'”
पुढे दिलीप प्रभावळकर सांगतात, “अनेकदा पालक मुलांना सांगतात की, आधी अभ्यास कर मग हे बाकीचं… पण माझ्या वडिलांनी तर मला यातच करिअर कर असं सांगितलं होतं. त्यांनी हे सांगताच मी माझ्या वडिलांवर चिडलो, त्यांना सुनावलं. म्हटलं ‘बाबा हे बेभरवशाचं क्षेत्र आहे. मी सायन्समध्ये करिअर केलं, नोकरी करतोय… याचा काय उपयोग?’ पण माझे बाबा खूप शांत स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांनी मला ‘मी फक्त आपलं सहज सांगितलं’ असं म्हटलं.”
दिलीप प्रभावळकर इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे दिलीप प्रभावळकर भावुक होत म्हणाले, “मग खूप वर्षांनी म्हणजे ‘हसवा फसवी’ या नाटकानंतर… अगदी माझ्या वयाच्या चाळीशीत वगैरे मी पूर्णवेळ अभिनेता झालो. पण ते बघायला मात्र बाबा नव्हते. त्यांनी कदाचित माझं या क्षेत्रात नाव होईल असं पाहिलं होतं.”