Milind Gawali Talk About Zapuk Zupuk Movie : ‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सूरजची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता. ‘बिग बॉस मराठी ५’च्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणची ‘झापुक झुपूक’ची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सिनेमाची बरीच चर्चा झाली होती; पण या सिनेमाला म्हणावं तसं यश मिळालं नाही.
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली. ‘बिग बॉस मराठी ५’ जिंकल्याने त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये चांगलीच वाढ झाली; पण सूरजचे हेच चाहते सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गेल्याचं तितकं दिसलं नाही. याबद्दल या सिनेमामधीलच अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं.
Telly Gappa या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद गवळी म्हणाले, “‘झापुक झुपूक’ सिनेमा खूप चालला… चालला म्हणजे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन आणि त्यामुळे तो चित्रपट चालला की नाही? हे आपण नको बघूयात. पण ‘झापुक झुपूक’ लोकांना माहीतच नाही असं नाही. जे १५०-२०० सिनेमे येतात, ते कधी आले आणि कधी निघून गेले हे कळतसुद्धा नाही. पण, ‘झापुक झुपूक’ कधी आला आणि कधी निघून गेला असं झालं नाही. सूरज चव्हाणने हा सिनेमा केला आणि तो महाराष्ट्रभरात रिलीज झाला हे अनेकांना माहीत आहे.”
यानंतर ते म्हणतात, “सिनेमांचा प्रेक्षक आणि रील्सचा प्रेक्षक वेगळा आहे. त्याच्या रील्सला लाईक्स आणि कमेंट करणारे प्रेक्षक वेगळे आहेत आणि ते प्रेक्षक त्याचा सिनेमा बघायला आलेसुद्धा… नाही आले असं नाही. बऱ्याच चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा हाऊसफुल्ल होता आणि अनेकांनी सूरजचं कौतुकही केलं. कथा ऐकल्यानंतर अनेकांना वाटलं की, सूरज यात अभिनय करू शकेल की नाही. कारण तो काही शिकलेला अभिनेता नाही. पण, त्याच्याकडून काम करून घेतलं गेलं आणि हे असं काम होतं की सूरजचं अनेकांनी कौतुक केलं. मलासुद्धा त्याचं काम आवडलं.”
यानंतर त्यांनी असं म्हटलं, “कमल हासन आणि मणिरत्नम यांचा ‘ठग लाईफ’ सिनेमासुद्धा चालला नाही. ही दोन इतकी मोठी नावे असूनही त्यांचा सिनेमा प्रेक्षकांनी नाकारला. त्यामुळे प्रेक्षक कोणता सिनेमा चालवेल आणि कोणता नाकारेल हे सांगता येत नाही. ईदच्या दिवशी सलमानचा सिनेमा चालणार नाही, असं अनेक वर्षांत कधीच झालेलं नाही. पण, त्याचा ‘सिकंदर’ सिनेमा चालला नाही.”
यापुढे ते असं म्हणतात, “मला यानिमित्ताने केदार शिंदेंचं कौतुक करावंस वाटतं की, त्यांनी सूरजला दिलेला शब्द पाळला. तो सिनेमा केवळ केला नाही, तर त्यासाठी त्यांनी सूरजवर मेहनतही घेतली. तसंच केवळ सूरज नव्हे; तर दोन-चार इतर नवीन मुलांनासुद्धा त्यांनी संधी दिली, त्यामुळे ‘झापुक झुपूक’ने बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळवलं नसेल; पण माझ्यासाठी तो यशस्वी सिनेमा आहे.”
मिलिंद गवळी इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे मिलिंद गवळी असं म्हणतात, “रोज १५० सिनेमे येतात, त्यापैकी ‘झापुक झुपूक’ एक चालला नाही, कारण प्रेक्षकच चित्रपटगृहांपर्यंत येत नाहीत. ओटीटीवर दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात, त्यामुळे प्रेक्षक घराबाहेर पडतच नाहीत. गरिबाला आज मल्टिप्लेक्स परवडत नाहीत. श्रीमंत लोकांनासुद्धा त्याबद्दल विचार करावा लागतो. चार-पाच जणांचं कुटुंब असेल तर तुमचे दोन-तीन हजार असेच जातात, त्यामुळे फक्त मनोरंजनासाठी ते तितकं पुरेसं नाही. त्या पैशात माणूस त्याच्या मुलांना वेगळ्या पद्धती देऊ शकतो. त्या पैशांत तर ओटीटीचं सबस्क्रिप्शन येतं. त्यात तुम्हाला असंख्य सिनेमे पाहता येतात.”
यापुढे मिलिंद गवळी म्हणाले, “प्रत्येक ओटीटी माध्यमातून तुम्हाला अनेक सिनेमे पाहायला मिळतात. लोकांकडे आता तितका वेळही नाही. पूर्वी आम्ही दादरहून चर्चगेटच्या दिशेने आणि बांद्रा-अंधेरीच्या दिशेने चित्रपट पाहायला जात असू. पण, आता तुमच्या आजूबाजूलाच अनेक चित्रपटगृहं आहेत, त्यामुळे मनोरंजन खूप सोपं पण महाग झालं आहे. जे दीडशे सिनेमे येतात, त्यापैकी फक्त पाचच सिनेमे चालत आहेत.”