‘नाळ २’ या चित्रपटामुळे सध्या नागराज मंजुळे चर्चेत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही झळकले. लेखन आणि दिग्दर्शनाबरोबरच नागराज सध्या अभिनयातही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. कायम हटके, वेगळे आणि डोक्याला खाद्य देणारे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक नागराज आहेत. आपल्या चित्रपटातून ते समाजाबद्दल, विषमतेबद्दल भाष्य करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच नागराज यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन अ न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात नागराज यांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल तसेच एकूणच समाजातील विषमतेवरही भाष्य केलं. याबरोबरच नागराज यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दलही काही खुलासे केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील नागराज यांचा चित्रपट चित्रपट चर्चेत आहे. याबरोबरच नागराज हे मटका किंग रतन खत्री यांच्यावरही चित्रपट काढणार आहेत.

आणखी वाचा : “हा भेदभाव…” दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी केलेलं ‘सैराट’बद्दलचं वक्तव्य चर्चेत

याबद्दल विचारणा झाल्यावर नागराज म्हणाले, “या चित्रपटाची स्क्रिप्ट जवळपास पूर्ण झाली आहे. मी व माझे मित्र अभय आम्ही दोघांनी मिळून यावर काम केलं आहे. यावर आम्ही गेली ३ ते ४ वर्षं काम करत आहोत. रतन खत्री हे फार रंजक पात्र आहे, खासकरून महाराष्ट्र आणि मुंबईत तर समाजातील प्रत्येक वर्गातील व्यक्तीला रतन खत्री हे नाव ठाऊक आहे. खरंतर याकडे नकारात्मक दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं पण आम्ही ही गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत.”

कोण होता रतन खत्री?

अंडरवर्ल्डपासून गॅंगवारपर्यंतच्या दहशतीत मुंबईमध्ये ‘मटका’सुद्धा चांगलाच चर्चेत आला. आकड्यांच्या या खेळाने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, पण या खेळाचं व्यसन लागलेल्या लोकांसाठी मसीहा बनला तो रतन खत्री. मटक्याच्या धंद्याला चांगले दिवस रतन खत्रीमुळेच आले. १९६० च्या दशकात रतन खत्रीच्याया मटक्याच्या व्यवसायाने मुंबईत चांगलेच बस्तान बसवले होते. नंतर दिवसाला या जुगारात तब्बल एक एक कोटींची उलाढाल होऊ लागली. देशभरात रतन खत्रीने असेच बेकायदेशीर मटक्याचे जाळे उभे केले. कित्येक बॉलिवूडमधील निर्मातेसुद्धा आर्थिक अडचणीच्या वेळेस रतन खत्रीच्या दाराशी येत. २०२० मध्ये रतन खत्रीचे त्याच्या राहत्या घरी निधन झाले.

याच मुलाखतीमध्ये नागराज यांनी ‘सैराट’च्या विषयावरही भाष्य केलं. सैराट किंवा फॅन्ड्रीसारख्या चित्रपटातून नागराज जुनीच गोष्ट सांगत आहेत असं बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं. याबरोबरच नागराजने त्याला त्याच्या जातीमुळे झालेल्या अपमानाबद्दल आणि इतर काही घटनांबद्दलही नागराज यांनी अत्यंत मोकळेपणाने भाष्य केलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule speaks about his upcoming movie on matka king ratan khatri avn