Prarthana Behere Husband Abhishek Jawkar Marathi Movie : मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनानं ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या टिव्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने काही प्रोजेक्ट्समधून काम केलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे. या मालिकेत प्रार्थना आणि श्रेयस तळपदेच्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. शिवाय प्रार्थनाने ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, यांसारखे चित्रपट केले. नुकतीच ती ‘बाई गं’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बूम’ या चित्रपटांमध्ये झळकली होती.
अशातच आता प्रार्थना अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. लवकरच ती एका मराठी चित्रपटामधून मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा नवरा अभिषेक जावकर करणार आहे. याबद्दल स्वत: प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. प्रार्थनाचा मुख्य अभिनेत्री म्हणून आणि तिचा नवरा अभिषेक जावकरचे दिग्दर्शन असलेल्या या आगामी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला.
प्रार्थना व तिच्या नवऱ्याच्या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त अगदी पारंपरिक पध्दतीने पार पडला असून याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवाय यानिमित्ताने अभिनेत्रीने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यावेळी प्रार्थनाने असं म्हटलं आहे की, “अभिनेत्री म्हणून मी आणि दिग्दर्शक म्हणून माझे पती…. आम्ही पाहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. पतीबरोबरचा माझा स्वप्नवत प्रवास सुरू होत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असूद्या.” प्रार्थनाने शेअर केलेल्या या पोस्टखाली अभिजीत खांडकेकर, पूजा सावंत, अनघा अतुल, हेमळ इंगळे यांसारख्या अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, प्रार्थना बेहेरे मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहे. शिवाय तिचा पती अभिषेक जावकर हादेखील याच क्षेत्रातील आहे. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. काही वर्षांपुर्वी त्याने ‘रेड बल्ब स्टुडिओ’ज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली. ‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरणदेखील केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे.
प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रार्थनाने २०१७ मध्ये अभिषेकशी लग्न केलं. अभिषेकने प्रार्थनाला लग्नासाठी विचारल्यावर हे दोघंही एकमेकांना डेट करू लागले. मग १४ नोव्हेंबर २०१७ मध्ये या दोघांचा गोव्यात विवाहसोहळा पार पडला. दरम्यान, प्रार्थना व तिचा पती अभिषेक हे दोघे मिळून कोणता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार? हा चित्रपट नक्की काय असणार? चित्रपटाचं नाव काय असेल? याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.