Sachin Pilgaonkar on Urdu Langauge: दिग्गज मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मराठीबरोबर हिंदी फिल्म इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सचिन पिळगांवकरांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. सचिन यांनी आता उर्दू भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याने लक्ष वेधले आहे.
सचिन पिळगांवकरांनी सिनेविश्वात बालपणापासून काम केलंय. त्यामुळे त्यांच्या अनेक दिवंगत दिग्गज कलाकारांबरोबरच्या आठवणी आहेत. बरेचदा ते त्या कलाकारांचे जुने किस्से, आठवणी मुलाखतींमध्ये शेअर करत असतात. तसेच ते विविध विषयांवर त्यांची मतही मांडत असतात. माझी मातृभाषा मराठी असली तरी उर्दूवर प्रचंड प्रेम आहे, असं विधान सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे.
उर्दू भाषेबद्दल काय म्हणाले सचिन पिळगांवकर?
सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच ‘बहार ए उर्दू’ या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी उर्दू भाषेबद्दल भावना व्यक्त केल्या. “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला रात्री ३ वाजता माझी बायको किंवा कोणीही उठवलं, तरी मी जागून उर्दूच बोलतो. मी केवळ उर्दूतून जागा होत नाही, तर मी उर्दूबरोबर झोपतोही. उर्दू ही एकमेव सवत आहे ही माझ्या बायकोला आवडते,” असं सचिन पिळगांवकर म्हणाले.
मीना कुमारीमुळे उर्दूबद्दल प्रेम निर्माण झाले
सचिन पिळगांवकर यांना दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांनी उर्दू भाषा शिकवली होती. सचिन फक्त १० वर्षांचे होते. ‘मझली दीदी’ चित्रपटात त्यांनी मीना कुमारीबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची मैत्री झाली. १९६७ साली आलेल्या या चित्रपटासाठी मीना कुमारी यांनी सचिन यांना आठवड्यातून चार वेळा आपल्या घरी उर्दूचे धडे देण्याची व्यवस्था केली होती. तेव्हापासून उर्दूबद्दल खूप प्रेम निर्माण झाले, असं ते अनेक मुलाखतींमध्ये सांगतात.
सचिन पिळगांवकर यांनी मधुबाला, संजीव कुमार यांच्याबरोबरच्या आठवणीही सांगितल्या होत्या. संजीव कुमार ऑटोग्राफ घ्यायला घरी आले होते, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. दरम्यान, सचिन पिळगांवकर यांनी ‘शोले’, ‘नदिया के पार’, ‘बालिका वधू’, ‘बचपन’, ‘ब्रह्मचारी’, ‘सत्ते पे सत्ता’ सह अनेक गाजलेले बॉलीवूड चित्रपट केले आहेत. तर, मराठीमध्ये ‘अशीही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.