नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. शरद पोंक्षे हे कोणत्या ना कोणत्या कारणांनी कायमच चर्चेत राहत असतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर त्यांच्या विविध राजकीय, सामाजिक विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. तसंच ते त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स सुद्धा शेअर करत असतात.

शरद पोंक्षेच्या लेकीने तिच्या करिअरमध्ये एक मजल मारली. त्यांची लेक सिद्धी ही वैमानिक झाली हे आपल्या सर्वांना माहित आहे. वैमानिक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी ती परदेशात गेली होती. याबद्दल शरद पोक्षेंनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. मुलीच्या वैमानिक होण्याच्या शिक्षणासाठी त्यांनी कर्ज काढलं होतं. शिवाय एक फ्लॅटही विकला. याबद्दल स्वत: शरद पोक्षेंनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘सर्व काही’ या युट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात शरद पोंक्षे असं म्हणाले, “मी माझ्या मुलीला अमेरिकेत कसं पाठवलं हे माझं मला माहीत. मला कोणी विचारलं का? तू इतके पैसे कधी उभे केलेस? कसे उभे केलेस? तू काई भ्रष्टाचार केलास का? तू दरोडा टाकून मुलीला पायलट केलंस का? नाही ना… २०२०-२१ मध्ये कोरोना आला. २०१९ च्या डिसेंबरमध्ये कोरोना आला. ते पूर्ण वर्ष मी कर्करोगाशी झगडलो आहे.”

यापुढे ते म्हणाले, “मी कर्करोगाशी लढा देत होतो. त्या काळात सगळं शून्यावर आलं होतं. माझं घर पूर्णपणे थांबलं होतं. थांबलेल्या घरावर येऊन कोरोना आणि लॉकडाऊन आदळला. त्यानंतर मी पूर्ण पैसे उभे केले. मी कर्ज काढलं. मी माझा एक फ्लॅट विकला. त्यानंतर मी माझ्या एफडी विकल्या असं करून मी मुलीला पायलट होण्यासाठी अमेरिकेला पाठवलं. हे कुणाला माहीत आहे?”

यानंतर त्यांनी टीका करणाऱ्यांबद्दल म्हटलं, “हे काही माहीत नसताना कमेंट्समध्ये उगाच काही तरी बोलत असतात. त्यात त्यांची नावेही वेगळीच असतात. आतासुद्धा माझी मुलाखत आल्यानंतर कमेंट्समध्ये बघितलं, तर ‘तू तुझ्या मुलीला अमेरिकेला पाठव आणि बहुजनांच्या मुलांना रस्त्यावर पाठव’ अशा अनेक कमेंट्स केलेल्या असतील. अरे याचा काय संबंध आहे का?”