सध्या रिमेक, सिक्वेल आणि बायोपिकचा भडिमार हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळत आहे. आता यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे मराठी संगीत नाटकांवर बेतलेल्या चित्रपटांची. ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या यशस्वी प्रयोगानंतर मराठी अभिनेता सुबोध भावे आता एक नवा प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नुकतीच सुबोधने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
चित्रपट, मालिकाविश्व आणि ओटीटी अशा तीनही मध्यमांत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती देणाऱ्या सुबोध भावेने नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अजरामर मराठी नाटक ‘संगीत मानापमान’वरुन प्रेरित अशा ‘मानापमान’ या आगामी चित्रपटाची एक छोटीशी झलक सुबोधने शेअर केली आहे. गेली बरीच वर्षं सुबोध भावे या प्रोजेक्टवर काम करत असल्याची चर्चा होती.
आणखी वाचा : “इंडस्ट्रीने सनी देओलच्या बाबतीत…” दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचे विधान चर्चेत
आगामी ‘मानापमान’चित्रपटाची झलक शेअर करताना सुबोधने लिहिलं, “शूरा मीं वंदिलें..! जिओ स्टुडीओज् अभिमानाने सादर करत आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर नाटकावरून प्रेरित, शंकर-एहसान-लॉय यांची सांगितिक भेट, सुबोध भावे अभिनित – दिग्दर्शित, ‘मानापमान’!” या टीझरमध्ये सुबोधचा एक रांगडा लुक पाहायला मिळाला आहे ज्यात तो तलवारबाजीचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
प्रेक्षक आणि सुबोधच्या चाहत्यांना त्याच्या या आगामी ‘मानापमान’च्या फर्स्ट लुकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लोकांना सुबोधचा लुकची पसंतीस पडला आहे. काही दिवसांपूर्वीच सुबोध ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या हिंदी चित्रपटात झळकला. त्याने ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या बायोपिकमध्येही काम केलं आहे. मध्यंतरी नसीरुद्दीन शाह यांच्या ‘ताज -डिव्हायडेड बाय ब्लड’ या वेबसीरिजमध्येही सुबोध बिरबलाच्या भूमिकेत दिसला. आता ‘मानापमान’ची झलक पाहून प्रेक्षकांनी त्याच्या या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या आहेत. २०२४ च्या दिवाळीदरम्यान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.