मुंबई : रहस्य, थरार आणि नात्यांची गुंतागुंत असणारा ‘घबाडकुंड’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सेट उभारण्यात आले आहेत. यापैकी एक सेट १७ हजार चौरसफुटांच्या जागेवर १२ हजार चौरस फुट जागेचा वापर करून उभारला आहे. या सेटवर पाण्याची कुंडं, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या-येण्याचे मार्ग निर्माण करण्यात आले असून तेथे रहस्यमय दृश्ये चित्रित केली जात आहेत. तसेच दुसरा सेट ५ हजार चौरस फूट आणि तिसरा सेट ८ हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आला आहे.

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील हे निर्माते रसिक कदम आणि सहनिर्मात्या स्मिता पायगुडे -अंजुटे यांच्या साथीने ‘घबाडकुंड’ हा रहस्यमयी भयपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर आदी कलाकारांची फौज झळकणार आहे. तर व्हेलेंटिना इंडस्ट्रीजचे विशेष सहकार्य लाभलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. तर कला दिग्दर्शन योगेश इंगळे, रंगभूषा अभिषेक, छायांकन योगेश कोळी आणि संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता आकाश जाधव व प्राॅडक्शन मॅनेजर सिद्धार्थ आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फाइट मास्टर व ‘पुष्पा २’ चित्रपटासाठी काम केलेल्या कार्तिक डंगरी यांनी साहसदृश्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

‘घबाडकुंड’ चित्रपटासाठी पुणे जिल्ह्यातील खेड – शिवापूर परिसरात तिन्ही सेट कला दिग्दर्शक योगेश इंगळे यांनी ५० जणांच्या साथीने दोन महिन्यांत उभारले आहेत. त्यासाठी सहा महिने सर्व संदर्भ तपासणे, रेखाचित्रे काढणे आणि सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला होता. या सेटवरील प्रत्येक वस्तू खरीखुरी वाटण्यासारखी तयार करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक व अनोख्या तंत्रज्ञांचा वापर करण्यात आला असून प्रेक्षकांना वास्तवदर्शी वाटण्यासारखी आणि एखाद्या भयपटाला आवश्यक वातावरण निर्मिती प्रभावीपणे करण्यात आली आहे.

‘लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांची उत्तम भट्टी घबाडकुंड चित्रपटाच्या निमित्ताने जमून आली आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या, कलात्मकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या कोणतीच कसर सोडलेली नाही. त्यामुळे भव्य चित्रपटाची निर्मिती होणार आहे आणि एखादी चांगली कलाकृती प्रेक्षक निश्चितच पाहतात. परिणामी तिकीट खिडकीवर आर्थिक यश साधल्यामुळे निर्मात्यांचेही नुकसान होत नाही आणि त्यामुळे पुन्हा निर्माते एखाद्या चांगल्या चमूच्या वेगळ्या कलाकृतीचा भाग होण्यासाठी रस दाखवितात.

‘घबाडकुंड’ चित्रपटासाठी भव्य सेट उभारला असून एक अनोखी पर्वणी प्रेक्षकांसाठी असेल, या चित्रपटाकडे एक उदाहरण म्हणून पाहिले जाईल, हा विश्वास आहे’, असे निर्माते रसिक कदम यांनी सांगितले. तर संपूर्ण टीम प्रचंड कष्ट घेऊन काम करीत आहे. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट वेगळा ठरणार आहे. त्यामुळे घबाडकुंडला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सहनिर्मात्या स्मिता पायगुडे -अंजुटे यांनी केले आहे.

प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न

प्रेक्षकांना वेगळे पाहण्याची इच्छा असते, त्यामुळे ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या यशानंतर काहीतरी वेगळे करण्याचे ठरविले. कथेपेक्षा एक वेगळा अनुभव द्यायचा आहे. विनोद, भय, थरार, रहस्य आणि ॲक्शनने भरलेली परिपूर्ण कलाकृती ‘घबाडकुंड’ हा चित्रपट असणार आहे. इतर भाषांप्रमाणे मराठीतही चौकटीच्या पलीकडे जाऊन चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे, हा वेगळा अनुभव ‘घबाडकुंड’ चित्रपटातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न आहे. कोणीच कधीही न पाहिलेले ‘घबाडकुंड’ हे एक वेगळे जग आहे. कोणीही कल्पना केली नसेल की जमिनीच्या खाली पण एक गाव, गाभा आणि कुंड असेल, या मायावी जगात नेमके काय घडते, हे रहस्यमय पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आले आहे, असे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी सांगितले.

…अशी सेट उभारणी

‘मी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले होते. जेव्हा मी ‘घबाडकुंड” ची गोष्ट ऐकली, तेव्हा ही एक वेगळी संहिता असून यामध्ये करण्यासारखे खूप असल्याचे जाणवले. या चित्रपटासाठी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात सेट करायचे ठरवले होते. मात्र काम पुढे सरकत गेले आणि डिझाइन बनत गेल्यानंतर विविध संकल्पना येत राहिल्या. तेव्हा विविध संदर्भ आणि रेखाचित्रांच्या आधारे भव्यदिव्य सेट उभारल्याचे निश्चित झाले. वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्यामुळे आव्हाने खूप होती. प्रतिकात्मक काय करू शकतो, याचा अभ्यास केला. दगडाची रचना, पाण्याचा प्रवाह व दगडातून पाझरणारे पाणी, रंगसंगती अशा विविध गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला असून प्रत्यक्षात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खराखुरा अनुभव येईल. आम्ही प्रचंड मेहनत घेऊन एक वेगळा सेट प्रेक्षकांना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे’ , असे कला दिग्दर्शक योगेश इंगळे यांनी सांगितले. तर घबाडकुंडच्या एका सेटवर चार वेगवेगळी स्थळ उभारली आहेत, त्यामुळे प्रकाशयोजना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे आणि संपूर्ण सेटची रचनाच वेगळी असल्यामुळे काम करायला मजा येत आहे, असे छायालेखक योगेश कोळी यांनी सांगितले.