ओम राऊत दिग्दर्शित “तान्हाजी : द अनसंग वॉरियर” या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून राजकीय वर्तुळातही चित्रपटाची चर्चा रंगत आहेत. त्यातच हिंदीमध्ये प्रदर्शित होत असलेला हा चित्रपट मराठीमध्येही प्रदर्शित व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र हिंदी चित्रपट मराठीमध्ये डब करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कायम विरोध असतो. त्यामुळे यावेळी मनसेची नेमकी भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तान्हाजी यांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी मनसेनेदेखील “तान्हाजी : द अनसंग वॉरियर” मराठीत डब व्हावा असं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवर एक ट्विट करुन “तान्हाजी : द अनसंग वॉरियर” मराठीमध्ये जरूर डब व्हावा असं म्हटलं आहे. त्यामुळे मनसेने या चित्रपटाची दखल घेतल्याचं दिसून येत आहे. ‘हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करुन प्रदर्शित करण्याला मनसेचा कायमच विरोध आहे. मात्र ”तान्हाजी : द अनसंग वॉरियर” या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निडर मावळ्यांचा पराक्रम जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा. चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता अजय देवगण यांचे अभिनंदन’, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. अमेय खोपकर यांनी ट्विट करुन “तान्हाजी : द अनसंग वॉरियर” या चित्रपटाला मराठीमध्ये डब करण्यास परवानगी दिली आहे.


दरम्यान, सध्या ‘पानिपत’ आणि ‘तान्हाजी’ हे दोन मोठे ऐतिहासिक चित्रपट चर्चेत येत आहे. या दोन्ही चित्रपटांमधून मराठ्यांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष या चित्रपटांकडे वेधलं आहे. विशेष म्हणजे तान्हाजी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला काही वादांना सामोरं जावं लागत आहे. परंतु ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीस उद्भवणारे वाद नवीन नाहीत. याआधी ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘जोधा अकबर’ या सारख्या चित्रपटांनाही कारणांमुळे विरोध झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns supports tanhaji the unsung warrior to dubbed in marathi ssj