आदित्य चोप्रा दिग्दर्शित आणि यशराज फिल्म निर्मित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ १९९५ च्या दिवाळीत झळकून खणखणीत यशस्वी ठरला आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणा-या चित्रपटाच्या वैशिष्ट्याला वलय प्रप्त झाले. दिलवाले दुल्हनियाचे तेव्हा न्यू एक्सलसियर मुख्य चित्रपटगृह होते. तेथे नियमित खेळासाठी पन्नास आठवड्याचे यश संपादन केल्यावर तो मराठा मंदिर येथे सकाळच्या खेळाला, अर्थात मॅटीनी शोला वळवण्यात आला. तेथे तो आजही सुरू असून त्याची हजारावा आठवड्याकडे वाटचाल सुरू आहे.
दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, मिशन कश्मिर, मोहब्बते, ओम शांती ओम, रा. वन, हे सगळेच दिवाळीच्या दिवशी झळकून यशस्वी ठरलेले चित्रपट. पण पंचवीस वर्षापूर्वीच्या दिवाळीत कोणता चित्रपट झळकला होता याचा छोटासा फ्लॅशबॅक नको का? तो होता, ‘तेजाब’. दिनेश गांधी यांनी सादर केलेला आणि निर्माता-दिग्दर्शक एन. चन्द्रा यांचा हा चित्रपट १९८८ च्या दिवाळीच्या दिवशी झळकला आणि आजही त्याचा दबदबा जाणवतो. तेव्हा त्याचे मुंबईतील मुख्य चित्रपटगृह होते दक्षिण मुंबईचे ड्रीमलॅण्ड. तेथेच त्याने रौप्यमोहत्सवी यश संपादले. या निमित्ताने काही ‘तेजाब’ गोष्टी सांगायलाच हव्यात.
अंकुश, प्रतिघात आणि तेजाब अशी एन. चंद्रा यानी यशाची हॅट ट्रीक साजरी केली. ‘तेजाब’चा मुहूर्त अंधेरीच्या नटराज स्टुडिओत पार पडला. त्यासाठी अमिताभ बच्चन आणि जीतेन्द्र प्रमुख पाहुणे होते. पण चन्द्रांच्या एकाही चित्रपटात त्या दोघाना चमकण्याची संधीच मिळाली नाही.
‘तेजाब’च्या एक दो तीन चार… गाण्याचे मेहबूब स्टुडिओत चित्रीकरण असताना ‘शूटींगचा ऑंखो देखा हाल’ पाह्यला आम्हा सिनेपत्रकाराना सेटवर आमंत्रित केले. तेव्हा त्या गाण्यात सहभागी झालेल्या नृत्यकलाकार आणि ज्युनियर आर्टीस्ट यांच्या गर्दीत आणि नृत्याच्या तयारीत एन. चन्द्रा आणि माधुरी दीक्षित या दोघांशीही सुसंवाद शक्य नव्हता. दोघानीही पुढील आठवड्यात घरी ये म्हटले. तेव्हा एन. चन्द्रा सांताकृझला शास्त्री नगरमध्ये प्रकाश इमारतीत राहत होते (आज ते मालाडला राहतात). माधुरी तेव्हा अंधेरी पूर्वेला जे. बी. नगरमध्ये राह्यची (तेजाब यशस्वी ठरल्यावर ती जुहूला चंदन सिनेमाजवळ राह्यला गेली) ‘तेजाब’च्या एक दो तीन चार… गाण्याच्या चित्रीकरणाचा ऑंखो देखा हाल संवेदना प्रकाशनच्या बॉलिवूड या मराठी पुस्तकात वाचायला मिळतो. ‘तेजाब’च्या यशाने अनिल कपूरचेही स्थान बळकट झाले.
‘तेजाब’पूर्वी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी ‘हिफाजत’मध्ये एकत्र आली (वटाटा वडा हे गाणे त्यातलेच), तेजाब नंतर ही जोडी राम लखन, बेटा, राजकुमार, प्रतिकार, जीवन एक संघर्ष, जमाई राजा, किशन कन्हय्या इत्यादी चित्रपटात दिसली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2013 रोजी प्रकाशित
दिवाळीचा चित्रपट… पंचवीस वर्षापूर्वीचा!
आदित्य चोप्रा दिग्दर्शित आणि यशराज फिल्म निर्मित 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' १९९५ च्या दिवाळीत झळकून खणखणीत यशस्वी ठरला आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणा-या चित्रपटाच्या वैशिष्ट्याला वलय प्रप्त झाले.

First published on: 30-10-2013 at 02:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movies releasing in diwali