दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यच्या ‘थांडेल’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात नुकताच विशाखापट्टणम येथे या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला नागा चैतन्य स्वत: उपस्थित राहिला होता. त्याने येथे उपस्थित चाहत्यांशीदेखील संवाद साधला. तसेच पत्नी सोभिता धुलिपालाची आठवण काढत तिचाही उल्लेख केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोभिता धुलिपालाचा विजाग गर्ल उल्लेख

नागा चैतन्यने ट्रेलर लॉन्चवेळी सोभिता धुलिपालाची आठवण काढली. तो म्हणाला, “विजाग माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. येथील एका मुलीवर माझं प्रेम जडलं आणि मी तिच्याशी लग्नही केलं, त्यामुळे आता माझ्या घरातसुद्धा विजागचा एक तुकडा आहे. माझ्या घरातसुद्धा सत्ताधारी पार्टी विजाग आहे”, असं नागा चैतन्य म्हणाला.

मी माझा सन्मान गमावून बसेन…

चित्रपटाबद्दल त्याने पुढे सांगितलं, “त्यामुळे भावांनो तुम्हाला माझी एक छोटीशी विनंती आहे, ‘थांडेल’ला विजागच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू द्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जोरदार चालला पाहिजे. नाही तर माझ्या घरी मी माझा सन्मान गमावून बसेन.”

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. यात साई पल्लवी आणि नागा चैतन्य या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. नागा चैतन्यचा बहुप्रतिक्षीत ‘थांडेल’ चित्रपट आधी मकरसंक्रातला प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून हा चित्रपट आता ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चंदू मोंडेटी दिग्दर्शित ‘थांडेल’ या चित्रपटात नागा चैतन्यने श्रीकाकुलम हे पात्र साकारलं आहे, तर त्याच्यासह मुख्य भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. चित्रपटाची कथा मच्छीमारांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. चित्रपटात नागा चैतन्यदेखील एक मच्छीमार आहे. हा चित्रपट तेलगू, तमिळ आणि हिंदी या भाषेतसुद्धा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान, नागा चैतन्यचा हा दुसरा विवाह आहे. समंथा रुथ प्रभूबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्याचं नाव सोभिताबरोबर जोडलं जात होतं. या काळात त्याला काही प्रमाणात ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादच्या प्रतिष्ठित अन्नपूर्णा स्टुडियोमध्ये नागा चैतन्य आणि सोभिता या दोघांचा शुभविवाह पार पडला. या लग्न सोहळ्याला कुटुंबातील व्यक्ती आणि काही जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chitany called his wife sobhita bhulipala vizag girl at trailer launch of thandel in visakhapatnam rsj