मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या ‘लय भारी’ या चित्रपटाची नोंद आहे. ‘लय भारी’ने तिकीटबारीवर ३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचा विक्रम लवकरच मोडीत निघणार की काय?, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. वर्षांच्या पहिल्याच तारखेला, पहिल्याच आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या, नाना पाटेकर यांच्या अस्सल अभिनयाने रंगलेल्या ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ३५ कोटींची कमाई केली असून शनिवापर्यंत हा चित्रपट तिकीटबारीवर नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास निर्मात्यांना वाटतो आहे.
तात्यासाहेब शिरवाडकरांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेल्या ‘नटसम्राट’ नाटकाने गेली कित्येक वर्ष रंगभूमीवरच्या प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. अभिजात कलाकृतीचे बिरुद मिरवणारे हे नाटक पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर अवतरले आणि नाना पाटेकर यांनी साकारलेल्या नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांना प्रेक्षकांकडूनही तितकाच उदंड प्रतिसाद मिळाला. ‘नटसम्राट’ हा चित्रपट पूर्णत: कौटुंबिक चित्रपट आहे. एकीकडे त्याला कुसुमाग्रजांच्या भाषेची ताकद आहे, नाटकाचा लौकिक आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी अशा प्रकारच्या अभिजात चित्रप्रयोगाला मिळालेले यश ही मराठी प्रेक्षकांच्या प्रगल्भतेची खूण आहे, असे मत चित्रपटाचे निर्माते ‘झी स्टुडिओ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन केणी यांनी दिली. ‘लय भारी’ला मिळालेला प्रतिसाद लक्षात येण्यासारखा होता. गाणी, कथा, रितेश देशमुखची अॅक्शन या सगळ्या गोष्टी त्यात होत्या. ‘नटसम्राट’ची गोष्ट वेगळी होती, असे केणींचे म्हणणे आहे.
पहिल्या आठवडय़ात १० कोटी रुपये आणि आता तिसरा आठवडा पूर्ण करताना ३० कोटी रुपयांचा जादुई आकडाही या चित्रपटाने पार केला आहे. दुसऱ्याच आठवडय़ात ‘वजीर’ सारखा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट प्रदर्शित होऊनही ‘नटसम्राट’ची गर्दी क मी झाली नव्हती. मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच काहीतरी एक नवीन संकल्पना असते. चित्रपट पाहिल्यानंतर तुमची म्हणून एक विचारप्रक्रिया सुरू व्हायला हवी. तो आनंद मराठी चित्रपट पाहताना मिळतो, असे सांगणाऱ्या राजीव राय यांनी ‘नटसम्राट’ हा नाना पाटेकरांच्या अभिनयापासून सगळ्याच गोष्टींमध्ये सरस होता, अशी पावती दिली आहे. राजीव राय स्वत: उत्तरप्रदेशातील असूनही त्यांना मराठी चित्रपट पहायला आवडतात. हिंदी चित्रपट हे सध्या कमालीचे कृत्रिम आणि आपल्या विश्वापासून दूर वाटतात. त्यामुळे चांगल्या मराठी चित्रपटाविषयी ऐकायला मिळाले की आवर्जून तो पाहिला जातो, असे त्यांनी सांगितले.
राजीवप्रमाणेच मराठी चित्रपट पहायला आवडणाऱ्या नंदन नान्शी यांनी ‘नटसम्राट’ या नाटकाविषयी खूप ऐकले होते. नाटक पहायला मिळाले नाही, पण हा चित्रपटही त्या नाटकाच्याच तोडीचा असेल, असे मत व्यक्त केले. नाना पाटेकर यांना रंगभूमीवरची व्यक्तिरेखा मोठय़ा पडद्यावर साकारताना पाहणे, त्यांच्या खास शैलीतील संवाद ऐकण्याच्या उत्सूकतेपोटीही अनेक अमराठी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला. मुळचा तेलुगू भाषिक असलेल्या राजू मुधुपग यानेही ‘नटसम्राट’ आवर्जून पाहिल्याचे सांगितले. मी मुंबईतच लहानाचा मोठा झालो आहे त्यामुळे मराठी चित्रपट पहायला फार आवडतात, असं राजूचं म्हणणं आहे. नाना पाटेकरांच्या तोंडी आणखी काही नाटकातले संवाद ऐकायला मिळाले असते तर ते आणखी आवडलं असतं, अशी पुस्तीही त्याने जोडली.
चित्रपटाला भाषा नसते, असे आपण कित्येक वेळा म्हणतो, ‘नटसम्राट’च्या बाबतीत ते विधान एक दिग्दर्शक म्हणून आपण नव्याने अनुभवलं असल्याचं मांजरेकर यांनी सांगितलं. मराठी चित्रपटांना अमराठी प्रेक्षकांचा असाच पाठिंबा मिळत राहिला तर मराठी चित्रपटांची बाजारपेठ आणखी विस्तारेल आणि ही मराठी चित्रपट उद्योगासाठी खूप चांगली गोष्ट आहे, असे मत व्यक्त करतानाच मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना गृहीत धरणं सोडून द्यायला हवं, असं आवाहनही मांजरेकर यांनी केलं. ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ हा चित्रपट आता चौथ्या आठवडय़ात प्रवेश करेल, तिसऱ्या आठवडय़ातही पाच मराठी चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाची तिकीटबारीवरची घोडदौड कायम राहिली आहे. चौथ्या आठवडय़ातही १७५ चित्रपटगृहांमधून चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यामुळे जानेवारी संपता संपता हा चित्रपट नवा मैलाचा दगड कायम करेल, अशी अटकळ चित्रपटसृष्टीत बांधली जात आहे.
‘नटसम्राट’मध्ये अभिनेता नाना पाटेकर यांना बेलवलकरांच्या भूमिकेत पाहण्याचे अनेकांना आकर्षण होते. नाना पाटेकर हिंदीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने साहजिकच त्यांचा अमराठी चाहता वर्गही मोठा आहे. त्यामुळे अमराठी प्रेक्षकांबरोबरच मराठी प्रेक्षकांनाही नानांना या भूमिकेत पाहण्याची मोठी उत्सुकता होती. त्याची परिणती म्हणून कित्येक अमराठी प्रेक्षकांनीही चित्रपटाला गर्दी केली. ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ सारख्या चित्रपटांना मिळणारे यश हे प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीचेही द्योतक आहे. प्रेक्षकांना आता फक्त रोमँटिक कथा असणारे चित्रपट नको तर चांगली कथा, व्यक्तिरेखा आणि मानसिक समाधान देणारा चित्रपट प्रेक्षकांना हवा आहे, हेच या यशातून सिद्ध होते.
नितीन केणी, चित्रपटाचे निर्माते
‘नटसम्राट’च्या यशाचे फार मोठे श्रेय प्रेक्षकांचे जाते. ‘नटसम्राट’ ही शोकांतिका असल्याने प्रेक्षक एकदा हा चित्रपट पाहतील, असा विचार आपण केला होता. पण प्रेक्षकांनी पाच-पाच वेळा चित्रपट पाहिला हे ऐकल्यावर आपल्याला धक्काच बसला. गेल्या काही वर्षांत जे मराठी चित्रपट आले मग तो ‘किल्ला’ असेल, ‘एलिझाबेथ एकादशी’ असेल हे चित्रपटच वेगळ्या धाटणीचे होते आणि तरीही त्यांनी लक्षणीय यश मिळवलं, याचाच अर्थ प्रेक्षकांना अॅक्शनच पाहिजे, आयटम साँग पाहिजे ही आपल्या डोक्यातील विचारांची भुतं आहेत हे आता आपल्याला कळून चुकलं आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर</strong>