‘भाभी जी घर पर है’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी अनीता भाभीच्या भूमिकेत नेहा पेंडसेने मालिकेत एण्ट्री केली होती. आता नेहाने त्या मालिकेचा निरोप घेतल्याचे म्हटले जातं आहे. दरम्यान, नेहाने एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नेहा मालिकेत दिसतं नाही. त्यामुळे नेहाने मालिकेचा निरोप घेतला अशा चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाल्या आहेत. नेहाने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत नेहाने या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. “गेल्या काही दिवसांपासून मी मालिकेत दिसत नसल्याने या अफवा सुरु झाल्यामुळे मला याचे आश्चर्य वाटतं नाही. प्रदर्शित करण्यात आलेले हे भागं जुने आहेत आणि मी त्या चित्रीकरणाचा भाग नव्हते. जेव्हा हे एपिसोड प्रदर्शित करण्यात आले तेव्हा अनेकांनी मला मेसेज केले आणि त्यांना माझी आठवण येत आहे असे ते म्हणाले. मी त्यांना समजावून सांगितलं की मी परत येणार आहे. मला ती भूमिका साकारायला मज्जा येते आणि मी त्या मालिकेचा भाग आहे,” असे नेहा म्हणाली.

ती पुढे म्हणाली, “सुरुवातीला लोक माझी तुलना त्या अभिनेत्रीशी करायचे, जी माझ्या आधी ही भूमिका साकारायची आणि हे मला माहित होतं की असं घडणार. पण आता या भूमिकेत लोकांनी मला स्वीकारले आहे आणि मी ही तिकडे रमले आहे.”

शो मध्ये असलेले संपूर्ण कलाकार आणि सर्व सदस्य हे एका हॉटेलमध्ये बायो बबलमध्ये आहेत. अशा परिस्थितीत नेहाने तिचा चित्रीकरणाचा अनुभवही शेअर केला आहे. ती म्हणाली, “मी उत्साही आणि चिंताग्रस्त आहे कारण अशा परिस्थितीत चित्रीकरण करणे खूप धोकादायक आहे. मला खात्री आहे की ते आमच्या सुरक्षिततेची काळजी घेतील. आम्ही एका सुरक्षित ठिकाणी बायो बबलमध्ये शूटिंग करणार आहोत आणि तेच लोक असणार आहेत ज्यांची करोनाची चाचणी ही निगेटिव्ह आहे.”

आणखी वाचा : “करीना, करिश्मा, अमृता आणि माझ्यात ही गोष्ट सारखी आहे…”, मलायकाने केला खुलासा

दरम्यान, करोनामुळे लागु करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मुंबईत मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. त्यात ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेचे चित्रीकरण हे सुरतमध्ये सुरु आहे.