Loksatta Abhijat LIT Fest Akshay Shimpi Performed Dastaan-E-Ramji : अक्षय शिंपी या अभिनेत्याने त्याची सहकारी अभिनेत्री नेहा कुलकर्णी हिच्या साथीने ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये ‘दास्तान-ए-रामजी’ या त्याच्या ‘दास्तानगोई’चा (कथाकथन) प्रयोग सादर केला. यावेळी त्याने या कथन कलाप्रकाराची सुरुवात कशी झाली? हा कलाप्रकार भारतात कसा आाला? आणि कसा रुजला? याबाबतची तथ्ये उलगडून सांगितली.

हा अभिनेता लखनौमध्ये दास्तानगोई या उर्दूमधील पारंपरिक कथाकथन प्रकाराच्या संपर्कात आला आणि त्या प्रकाराने त्याला झपाटले. एकाच विषयाच्या धाग्यात विणलेल्या छोट्या छोट्या अनेक कथा व कविता असलेल्या आपल्या “दास्तान-ए-बड़ी बांका” या पहिल्या प्रयोगाद्वारे त्याने दास्तानगोई हा प्रकार मराठीत आणला आणि आता तो ‘दास्तान-ए-रामजी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत आहे.

दास्तानगोई म्हणजे काय?

अक्षय शिंपी म्हणाला, “मी ‘दास्तान-ए-रामजी’ हा कथन कलाप्रकार सादर करतोय. मुळात दास्तान हा मूळचा फारसी शब्द आहे. याचा अर्थ कथा असा होतो आणि गोई म्हणजे सांगणे, मांडणे किंवा ऐकवणे, यामुळे दास्तानगोई म्हणजे स्टोरीटेलिंग, कथा सादर करणे किंवा कथा ऐकवणे, कथाकथन करणे असा अर्थ होतो. एका संशोधनानुसार हा कथन कलाप्रकार भारतात पर्शियामधून आला. तर, आणखी एक संशोधन असं सांगतं की हा कलाप्रकार इथेच जन्माला आला आहे. मात्र एकट्या भारतात हा कलाप्रकार जन्मलेला नसून एकाच वेळी तीन ठिकाणी हा कथन कलाप्रकार तयार झाला आहे.”

दास्तानगोईची सुरुवात कुठे झाली?

“तीन प्रदेशात एकाच एका आकृतीबंधाची गोष्ट समांतर पद्धतीने सांगितली गेली. भारतात ‘बृहत्कथासरीतागर’ हा प्रकार जन्माला येत होता. तर, त्याचवेळी पर्शियामधून ‘दास्तान-ए-हमजा’ हा प्रकार आला. दुसऱ्या बाजूला अरबस्तानात ‘अरेबियन नाइट्स’ सांगितली गेली. एक हजार गोष्टींचा प्रयोग. यामधील कथा, परिवेश, पात्र, भाषा आणि इतर सर्वकाही वेगळं होतं. मात्र, सांगण्याची पद्धत, आकृतीबंध सारखाच होता. तिन्ही कथन कलाप्रकार समांतरच आहेत. तिन्ही प्रकार एकमेकांमध्ये अगदी मिसळून गेले आहेत की काय असं वाटायला लावणारा हा कथन कलाप्रकार आहे.”

अक्षय शिंपी म्हणाला, “दास्तानगोई या लांबलचक गोष्टी असतात. ज्या खंडित होतात. यामध्ये एक कथा दुसऱ्या कथेला जन्म देते. दुसरी कथा तिसऱ्या कथेला, तिसरी चौथ्या कथेला जन्म देत जाते. अशी ही कथांची एक मालिका किंवा साखळी असते. यातली शेवटची कथा ही बीजकथेला येऊन मिळते आणि कथांचं आवर्तन पूर्ण होतं. मौखिक परंपरांमधून पुढे आलेला हा प्रकार वेड लावणारा आहे. यात भाव व ज्ञान निर्मिती करणाऱ्या कथा होत्या. यातून वेगवेगळ्या विषयांना हात घातला गेला.