Biggest flop legal drama thriller film: ओटीटी या माध्यमामुळे जगभरातील अनेकविध जॉनरचे चित्रपट, शो व वेब सीरिज आपण कुठेही पाहू शकतो. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स ही सुविधा उपलब्ध करून देत असतात.
अनेक चित्रपट, वेब सीरिज दर आठवड्याला, महिन्याला प्रदर्शित होत असतात. इतकेच काय, तर चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेले चित्रपटदेखील काही काळानंतर ओटीटीवर पाहायला मिळतात.
बऱ्यादचा असे पाहायला मिळते की, बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेले, थिएटरमध्ये गर्दी खेचून आणण्यात अपयशी ठरलेल्या चित्रपटांना ओटीटीवर मोठी पसंती मिळते. आज आपण अशाच एका चित्रपटाबद्दल जाणून घेऊ…
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला चित्रपट
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, जेव्हा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला, त्यावेळी त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट आहे. सण साजरा करण्यासाठी ती घरी येते; मात्र एका रात्री तिच्याबरोबर अशी घटना घडते, ज्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलते. त्यानंतर ती स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात करते. ही लढाई जिंकण्याच्या प्रवासात तिला समाजाची विचारसरणी, कुटुंबाच्या अपेक्षा आणि कायद्याचे अवघड रस्ते या सगळ्यांचा सामना करावा लागतो.
१७ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे नाव जानकी वर्सेस स्टेट ऑफ केरल, असे आहे. गेल्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर नंबर १ वर ट्रेंड करीत होता. प्रवीण नारायणन यांनी या चित्रपटाती पटकथा लिहिली आहे. त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुरेश गोपी, अनुपमा परमेश्वरन व श्रुति रामचंद्रन हे कलाकार यात प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. जानकी विद्याधरन या मुलीचा संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळतो. तिला एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते आणि त्यानंतर न्याय मिळवण्याच्या लढाईत तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कायदेशीर लढाईत तिला एका अशा वकिलाचा सामना करावा लागतो, जो आरोपीला साथ देतो. कोर्टरूममधील आरोप-प्रत्यारोप, पुरावे आणि स्वत:च्या आत्मसन्मानासाठीची जानकीची लढाई यांमुळे काही वेळा प्रेक्षकही भावूक होऊन जातात. दोन तास ३४ मिनिटांचा हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. कॉसमॉस एंटरटेन्मेंट्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी आठ कोटींचा खर्च आला. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फक्त चार कोटींचीच कमाई करू शकला. आता ओटीटीवर मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.
१५ ऑगस्ट २०२५ ला हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.