काही महिन्यांपूर्वी ‘फॅमिली मॅन’सारखी जबरदस्त हीट वेबसीरिज देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘फर्जी’ ही नवी वेबसीरिज प्रदर्शित झाली. यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसला. या सीरिजमधून शाहिदने ओटीटी विश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजचे सर्वत्र कौतुक झाले, शाहिद आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाची प्रशंसाही झाली. प्राइम व्हिडिओवरील सर्वात जास्त पाहिली गेलेली वेबसीरिज म्हणून ‘फर्जी’ने रेकॉर्डही आपल्या नावे केला.

खोट्या चलनी नोटा बनवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटबद्दल आणि एकूणच या गुन्ह्याबद्दल या वेबसीरिजमध्ये फार उत्तमरित्या भाष्य केलं गेलं आहे. शिवाय या सीरिजचे निर्माते राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ या वेबसीरिजशी याचं कनेक्शन जोडल्याने चाहते याच्या पुढच्या सीझनसाठी आणखीनच उत्सुक आहेत.

आणखी वाचा : “बच्चोंकी हिफाज़त के लिए माँ को राक्षस बनना पड़ता है…” सुश्मिताच्या ‘आर्या ३’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान या सीरिजचा दूसरा सीझनबद्दल शाहिदने माहिती दिली आहे. शाहिद म्हणाला, “ज्या ठिकाणी गोष्ट संपली आहे तो एक ओपन एंड आहे त्यामुळे भविष्यात बऱ्याच गोष्टी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामुळेच ‘फर्जी २’ लवकरच येणार आणि त्याऐवजी दुसरं काहीही आलं जे मला आवडेल ते मी नक्की करेन. परंतु ओटीटीसाठी मी अद्याप कशालाही होकार दिलेला नाही कारण यावर्षी माझे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, पण ‘फर्जी २’ नक्की समोर येईल.”

‘फर्जी’ प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी तिला चांगली पसंती दिली आहे. १० फेब्रुवारी रोजी ही वेबसीरिज प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर राशी खन्ना, रेजिना कॅसांड्रा, के के मेनन, कुब्ब्रा सैत आणि इतर अनेकजण सहाय्यक भूमिकेत आहेत. सध्या शाहिद कपूर क्रीती सेनॉनबरोबर एका चित्रपट लवकरच झळकणार आहे.