चित्रपटगृहांबरोबरच ओटीटीवरही दाक्षिणात्य चित्रपटांचा जलवा पाहायला मिळत आहे. काही तमिळ, मल्याळम चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग असतात. सध्या अशाच एका चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.७ रेटिंग मिळाले आहे. कोणता आहे हा चित्रपट आणि त्याची कथा काय आहे? ते जाणून घेऊयात.

सूथ्रवाक्यम असे या मल्याळम चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. चित्रपट ११२ मिनिटांचा आहे. अभिनेता शाइन टॉम चाकोने यात मुख्य भूमिका साकारली आहे. तो पोलिसाच्या भूमिकेत आहे. सूथ्रवाक्यम चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. अनेकांना हा चित्रपट फारच आवडला आहे.

सूथ्रवाक्यम सिनेमाची कथा काय?

या सिनेमाची गोष्ट पालक्काड जिल्ह्यातील एका गावात घडते. चित्रपटाची कथा सुरुवातीला हलकी-फुलकी वाटते, पण हळूहळू त्यातील गूढ बाजू समोर येतात. एका गावात एक पोलीस स्टेशन व त्याच्याजवळ सरकारी शाळा असते. सगळं सुरळीत सुरू असतं, पण एक घटना अशी घडते की शांतता भंग होते. या चित्रपटात कोणत्याही प्रकारचा मोठा हिंसाचार नाही, कोर्टारूम ड्रामा नाही. सामान्य वाटणाऱ्या निर्णयांचे सर्वांवर कसे परिणाम होतात, ते यात पाहायला मिळतं.

सूथ्रवाक्यम (Soothravakyam) चित्रटाची खासियत म्हणजे याची अनोखी कथा आहे. पोलीस स्टेशनचं रुपांतर मुलांच्या ट्यूशन सेंटरमध्ये होतं आणि तिथून सस्पेन्स सुरू होतो. हळूहळू तणाव वाढतो. लहान-मोठ्या निर्णयांचे इतरांवर होणआरे परिणाम, दोन मुख्य पात्रांमधील मूक संघर्ष तुम्हाला संपूर्ण चित्रपटात शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो.

शाइन टॉम चाकोचा शांत अभिनय मनाला भिडतो. तर, विन्सी अलॉयसचा अभिनय छाप पाडणारा आहे. सिनेमा आगदी आपल्यासमोर घडतोय, इतका त्यात जिवंतपणा आहे. खरे लोकेशन, कुटुंब आणि काम यांच्यातील संघर्ष आणि भावना आणि रोमांच यांचे संतुलन या चित्रपटात पाहायला मिळते. सूथ्रवाक्यम हा चित्रपट तुम्हाला २१ ऑगस्ट २०२५ पासून Lionsgate Play वर पाहता येईल.