OTT Releases of July Month : लॉकडाऊननंतर भारतात ओटीटीवरील सीरिज आणि चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ओटीटीवर येणारा नवनवीन कंटेट पाहण्यासाठी अनेक ओटीटी प्रेमी उत्सुक असतात. अशातच वेबसीरिज प्रेमींसाठी हा जुलै महिना खास असणार आहे. या महिन्यात ओटीटीवर थ्रिलर, ड्रामा, ऐतिहासिक आणि विनोदी अशा सगळ्या प्रकारच्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात कोणत्या सीरिज तुमच्या भेटीला येणार आहेत? चला जाणून घेऊ…
स्पेशल ऑप्स २ : नीरज पांडेच्या ‘स्पेशल ऑप्स’ या लोकप्रिय वेबसीरिज दुसरा सीझन या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेता केके मेनन मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय अभिनेता करण पुन्हा एकदा ‘हिम्मत सिंग’च्या भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनच्या काळात या वेबसीरिजला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. येत्या ११ जुलै रोजी ही सीरिज डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये के के मेननसह विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूर हे कलाकारही दिसणार आहेत.
आप जैसा कोई : सामाजिक बंधनांवर मात करत, प्रेमात समता जपण्याचा संदेश देणारा ‘आप जैसा कोई’ हा चित्रपटही जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आर. माधवन आणि फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘आप जैसा कोई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच आर. माधवन आणि फातिमा यांच्यातील केमिस्ट्रीची चर्चा रंगली आहे. जुन्या हिंदी रोमँटिक चित्रपटांप्रमाणेच हा सिनेमा असल्याचे म्हटलं जात आहे. येत्या ११ जुलैपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
कालीधर लापता : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हाउसफुल ५’ मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता तो लवकरच त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि हा चित्रपट म्हणजे ‘कालीधर लापता’. या सिनेमात अभिषेक बच्चन ‘कालीधर’ची भूमिका साकारत आहे. ‘कालीधर लापता’ येत्या ४ जुलै रोजी झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात अभिषेकसह दैविक भगेला आणि जीशान अय्यूब हेदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.
मंडला मर्डर्स : बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर ही तिच्या आगामी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी वाणी आता तिचं ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. वाणी ‘मंडला मर्डर्स’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाणीची ‘मंडला मर्डर्स’ येत्या २५ जुलै पासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्याअ भेटीला येणार आहे. यात तिच्यासह अभिनेत्री श्रिया पिळगावकर आणि जमील खानदेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
द हंट: द राजीव गांधी हत्याकांड केस : दिग्दर्शक नागेश कुकुनूर ‘द हंट: द राजीव गांधी हत्याकांड केस’ ही वेबसीरिजही जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांच्या ’90 डेज’ या पुस्तकावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये अभिनेता अमित सियाल मुख्य भूमिकेत आहे. ४ जुलैपासून सोनी लिव्हवर या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.