चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना आलेले कास्टिंग काउचचे कटू अनुभव सांगत असतात. आता अभिनेत्री सुरवीन चावलाने तिच्याबरोबर घडलेला असाच एक वाईट प्रसंग सांगितला. तिचं लग्न झालंय हे माहीत असताना एका दिग्दर्शकाने तिला किस करण्याचा प्रयत्न केला होता.

हॉटरफ्लायला दिलेल्या एका मुलाखतीत सुरवीनने तिच्याबरोबर घडलेल्या या घटनेबद्दल सांगितलं. असेच अनुभव तिला अनेक वेळा आले होते हेही तिने कबूल केलं. “मी तुम्हाला मुंबईच्या वीरा देसाई रोडवरची एक गोष्ट सांगते. त्या व्यक्तीच्या ऑफिसच्या केबिनमध्ये झालेल्या मीटिंगनंतर तो मला गेटपर्यंत सोडायला आला. हा प्रसंग माझ्या लग्नानंतर घडला होता. आणि विचित्र गोष्ट अशी होती की आम्ही मीटिंगमध्येही याविषयी बोललो होते. त्या व्यक्तीने मला विचारलं की सगळं कसं चाललंय आणि माझे पती काय करतात? आणि आम्ही फक्त त्याच्या केबिनमध्ये बोलत होतो कारण त्याचं ऑफिस मोठं होतं,” असं सुरवीन म्हणाली.

मला त्याला ढकलावं लागलं – सुरवीन

सुरवीन पुढे म्हणाली, “मी दाराजवळ पोहोचले आणि बाय बोलणार, तेव्हा तो माझ्याकडे झुकला आणि किस करण्याचा प्रयत्न करत होता, मग मला त्याला मागे ढकलावं लागलं. मी घाबरले आणि त्याला विचारलं की तू काय करतोय आणि मग मी निघून गेले.”

सुरवीनने आधी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, दक्षिणेतील एका दिग्दर्शकाची इच्छा होती तिने त्याच्याबरोबर झोपावं. त्याला हिंदी किंवा इंग्रजी येत नसल्याने त्याने त्याचा हेतू तिसऱ्या व्यक्तीमार्फत कळवला होता, असं सुरवीन म्हणाली होती.

सुरवीन म्हणाली होती की काही लोक “तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातात जिथे तुम्ही स्वतःबद्दल प्रश्न उपस्थित करता.” त्यानंतर तिने ते दिवस आठवले, जेव्हा ती टीव्हीवरून चित्रपटांकडे वळण्याचा प्रयत्न करत होती आणि मुंबईत तिच्या पहिल्या चित्रपटाच्या कार्यक्रमात गेली होती. तिथे सुरवीनचं दिसणं, वजन आणि कंबर तसेच छातीचा आकार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

सुरवीन चावलाचं करिअर

सुरवीनने २००३ मध्ये आलेल्या ‘कहीं तो होगा’ या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ती ‘कसौटी जिंदगी की’, ‘काजल’ आणि ‘२४’ यासारख्या टीव्ही शोमध्ये झळकली होती. २००८ मध्ये कन्नड चित्रपट ‘परमेशा पानवाला’ मधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि नंतर ती ‘हम तुम शबाना’, ‘अग्ली’, ‘हेट स्टोरी २’, ‘पार्च्ड’ आणि ‘छुरी’ यासारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या. त्यानंतर सुरवीनने ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले.

सुरवीन चावला नुकतीच पंकज त्रिपाठीबरोबर ‘क्रिमिनल जस्टिस सीझन ४’ मध्ये झळकली. ती ‘राणा नायडू सीझन २’ मध्ये दिसणार आहे, ही सीरिज १३ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.