Actress Ayesha Khan Found Dead : पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खानचे निधन झाले आहे. १९ जून रोजी कराची येथील तिच्या घरी ती मृतावस्थेत आढळली. तिचा मृत्यू एका आठवड्यापूर्वी झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, आयेशा खानच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांच्यामते, तिचा मृत्यू एक आठवड्यापूर्वी झाला होता आणि तिचे शरीर कुजले होते.
आयेशा खान जवळपास ४ दशकांपासून शो, टेलिफिल्म्स आणि चित्रपटांमध्ये काम करत होती. ती एक यशस्वी टीव्ही अभिनेत्री होती. ती शेवटची सौतेली ममता (२०२०) या शोमध्ये दिसली होती.
शेजाऱ्यांनी केली तक्रार
आयेशाच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांना केली. त्यांनी येऊन पाहिलं असता आयेशा मृतावस्थेत आढळली. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अधिकारी परदेशातून तिचा मुलगा येण्याची वाट पाहत असल्याने तपास थांबवण्यात आला आहे. त्यामुळे तिचा मृतदेह शवागारात नेण्यात आला आहे. आयेशाचा बाथरूममधून बाहेर निघताना पडून नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी सांगितलं.
आयेशाचा जन्म १९४८ मध्ये झाला होता. ती पाकिस्तानच्या दिग्गज टीव्ही अभिनेत्री खालिदा रियासत यांची मोठी बहीण होय. दोन्ही बहिणींनी पाकिस्तानमधील टीव्ही इंडस्ट्री गाजवली. आयेशाची बहीण खालिदाचा १९९६ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला.
काही अहवालांनुसार, आयेशाने शो बिझनेसमधून ब्रेक घेतल्यानंतर ती एकटीच राहत होती. ती फार बाहेर पडायची नाही. आयेशा ‘आखरी चट्टान’, ‘टिपू सुलतान: द टायगर लॉर्ड’, ‘देहलीज’, ‘दरारे’, ‘बोल मेरी मछली’ आणि ‘एक और आसमान’ यासारख्या शोमधील भूमिकांसाठी ओळखली जायची. तिने ‘मुस्कान’ (२०११) आणि ‘फातिमा’ (२०१२) या दोन चित्रपटांमध्येही काम केलं होतं. आयेशाच्या निधनाची बातमी समोर आल्यावर चाहते व कलाकार तिला श्रद्धांजली वाहत आहेत.