Rajat Bedi On Daughter Vera Bedi : रजत बेदीने अलीकडेच नेटफ्लिक्सवरील ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमध्ये पुनरागमन केले आहे. रजतने ‘कोई मिल गया’ आणि ‘द हिरो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. रजतबरोबर त्याची मुलगीही सध्या चर्चेत आहे. खरंतर, जेव्हा रजतची मुलगी वेरा ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या स्क्रीनिंगला उपस्थित राहिली तेव्हा तिचा लूक पाहून सर्वजण थक्क झाले. अनेकजण म्हणाले की ती करीना कपूर खानसारखी दिसते. आता रजतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रजत म्हणाला, “माझे संपूर्ण कुटुंब चर्चेत आहे, फक्त मीच नाही. माझी मुलेही सध्या चर्चेत आहेत. ते व्हायरल झाले आहेत आणि ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.” वेरा आणि करीना कपूर यांच्यातील तुलनांबद्दल अभिनेता म्हणाला, “ती खूप आनंदी आहे… अमेरिका, कॅनडा, लंडन, दुबई अशा सर्व ठिकाणांहून लोक फोन करत आहेत. ती खूप साधी आहे आणि तिने यापूर्वी कधीही अशा गोष्टीचा सामना केलेला नाही. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच ती तिच्या वडिलांबरोबर रेड कार्पेट कार्यक्रमात आली आहे.”

रजत लहानपणापासूनच चित्रपट उद्योगाचा एक भाग आहे आणि त्याला लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे फायदे आणि तोटे चांगलेच माहीत आहेत. रजत म्हणाला, “माझ्या मुलांना माहीत आहे की त्यांनी सर्वांशी सभ्य आणि आदरपूर्ण वागले पाहिजे. माझ्या मुलांना तुम्ही कधीही कोणाशीही असे वागताना किंवा असे काही करताना पाहणार नाही. हे सर्व त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे आणि ते खूप आनंदी आहेत.”

रजतने सांगितले की, त्याचा मुलगा विवान बेदी गेल्या दोन वर्षांपासून आर्यन खानबरोबर “द बॅड्स ऑफ बॉलीवूड”मध्ये काम करत आहे आणि आता तो अधिकृतपणे चित्रपट उद्योगात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. तो म्हणाला, “त्याला लाँच करण्याची योजना सुरू आहे.” वेराबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला तिने बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा विचार केला नव्हता, परंतु रजतने सांगितले की, ती आता त्याबद्दल विचार करत आहे. तिने पूर्वी कधीही त्याबद्दल विचार केला नव्हता.