काही महिन्यांपूर्वी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ प्रकरणामुळे वादात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर त्याला अटक देखील झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रानं या संपूर्ण पॉर्न व्हिडीओ प्रकरणावर मौन सोडलं असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज कुंद्रा यानं यासंदर्भात सविस्तर निवेदन जारी केलं असून त्यामध्ये आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचा दावा देखील त्यानं केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अश्लील चित्रफीत बनवणे आणि त्याचं वितरण करणे या गुन्ह्याखाली अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज कुंद्रानं प्रसार माध्यमांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा दावा या निवेदनात केला आहे. तसेच, आपल्यावरील आरोप देखील फेटाळून लावले आहेत. “प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असून मी अशा प्रकारचे व्हिडीओ बनवण्यात अजिबात सहभागी नव्हतो. हा सगळा प्रकार म्हणजे मला जाणून बुजून टार्गेट करण्याचा होता”, असं राज कुंद्रा म्हणाला आहे.

“माझ्या कुटुंबानंच मला दोषी मानलं”

दरम्यान, आपल्या कुटुंबाविषयी राज कुंद्राने नाराजी व्यक्त केली आहे. “दुर्दैवाने मी सिद्ध होण्याआधीच माध्यमांकडून आणि माझ्या कुटुंबीयांकडून दोषी म्हणून जाहीर झालो आहे. मला प्रचंड वेदना होत आहेत. अनेक स्तरांवर माझ्या घटनात्मक आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करण्यात आलं आहे”, असं राज कुंद्रा म्हणाला आहे.

..म्हणून कुठे लपून बसलो नाही!

सारंकाही स्पष्टपणे समोर यावं, म्हणून आपण कुठेही लपून बसलो नसल्याचं राज कुंद्रा म्हणाला आहे. “मला वाटलं या मीडिया ट्रायलमार्फत माझ्या प्रायव्हसीचा भंग केला जाणार नाही. माझ्या कुटुंबाला कायमच माझं प्राधान्य राहिलं आहे. याव्यतिरिक्त काहीही माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मला वाटतं की सन्मानाने जगणं हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे आणि माझीही तीच विनंती आहे. हे निवेदन वाचण्यासाठी वेळ काढलात त्यासाठी धन्यवाद. इथून पुढे माझ्या प्रायव्हसीचा सन्मान ठेवा”, असं देखील त्यानं या निवेदनात म्हटलं आहे.

४७ वर्षीय राज कुंद्राला गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे अटकेपासून अभय दिलं आहे. राज कुंद्रानं २५ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्या याचिकेमध्ये राज कुंद्रानं दावा केला होता की, संबंधित व्हिडीओ हे कोणत्याही प्रकारे शारिरिक वा लैंगिक संबंधाविषयीचं कृत्य दाखवत नाहीत. तसेच, अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्यामध्ये किंवा वितरीत करण्यामध्ये आपला कोणताही सहभाग नाही. आपल्याला या प्रकरणात अडकवलं गेलं आहे, असं राज कुंद्रानं याचिकेत म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra first statement on porn video case after release on bail shilpa shetty pmw